कुठल्याही कथानकाला एक शेवट हवा, मालिकेच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवतं. कारण चित्रपट हा एका कालावधीपुरता मर्यादित असतो पण हे मालिकेच्या बाबतीत मुळीच घडत नाही कारण दहा दहा बारा बारा वर्षे मालिकेचा सूर प्रेक्षकांसोबत जुळलेले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. वर्षानुवर्षे कथानक वाढवत ठेवण्यापेक्षा ते वेळीच आटोपलेले केव्हाही चांगले म्हणूनच आता आणखी एका मराठी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका आहे कन्यादान. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात आली. वडील आणि पाच मुलींच्या भावविश्वाची ही कहाणी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
नुकतेच या मालिकेतील कलाकार अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली होती. यावेळी कन्यादान मालिकेच्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. दरम्यान आता मालिकेनेच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित केले आहे. अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, स्मिता हळदणकर, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, शुभंकर एकबोटे, मृगा बोडस, स्वप्नील आजगावकर, अमित खेडेकर, विनेश निन्नूरकर, मानसी भरेकर अशी भली मोठी स्टार कास्ट या मालिकेला लाभली होती. जवळपास अडीच वर्षाहून अधिक काळ मालिकेच्या कलाकारांनी एकमेकांसोबत छान बॉंडिंग जुळवले होते त्यामुळे आता मालिकेला निरोप देताना साहजिकच त्यांना भावूक व्हायला झालं. निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी… असे म्हणत कलाकारांनी आज सेटवर केक कापून एकमेकांना निरोप दिलेला पाहायला मिळाला.
येत्या ६ मे २०२४ पासून आदिशक्ती ही नवीन मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे त्याचमुळे कन्यादान मालिकेला आटोपते घ्यावे लागल्याचे बोलले जाते. पल्लवी पाटील आणि सुयश टिळक हे या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.काही दिवसांपूर्वीच या मालिकेचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या समोर आले आहे. देवी आईच्या अद्भुत शक्तीची प्रचिती या मालिकेतून पाहायला मिळणार असल्याने भक्तांनी या मालिकेचे स्वागतच केले आहे.