जुनं फर्निचर चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद… २ दिवसात कमावली इतकी मोठी रक्कम
२६ एप्रिल रोजी महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा एक अतिशय संवेदनशील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. एक आगळेवेगळे कथानक म्हणून हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात गर्दी करू लागले आहेत. चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला त्यावेळी प्रथमच निर्माता म्हणून समोर आलेल्या सत्या मांजरेकर याने मीडियाशी संवाद साधला. हा एक अप्रतिम चित्रपट आहे आणि पप्पानी एक वेगळे कथानक प्रेक्षकांसमोर आणले आहे ते पाहून त्यांचं खूप कौतुक वाटतं अशी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिलेली पाहायला मिळाली. जुनं फर्निचर या नावातच चित्रपटाचे कथानक दडलेलं आहे. एखादं अडगळीच सामान म्हणून आपण जुन्या फर्निचरकडे पाहत असतो पण त्यांची यावयातही लढायची ताकद तेवढीच दांडगी आहे.
आपल्याला न सांभाळणाऱ्या मुलाच्या विरोधात केस करून या व्यक्तीने साऱ्यांनाच जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चित्रपटातील अनेक हळवे क्षण पाहणाऱ्याला रडवुन जाताना दिसत आहेत. चित्रपट गृहातून बाहेर पडणारे प्रेक्षक काहीतरी चांगले विचार घेऊनच बाहेर पडत आहेत असे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. समाजाचे डोळे उघडवणारा, अशा आशयाचा चित्रपट यायलाच हवा अशी भावना प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. १९९३ साली प्रदर्शित झालेला ‘संतान’ हा मौसमी चॅटर्जी आणि जितेंद्र यांचा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट याच कथानकाचा भाग आहे असे बोलले जाते. पण असे असले तरी मराठी सृष्टीतही असे प्रयोग होणे गरजेचे होते.
हा चित्रपट बनवावा म्हणून महेश मांजरेकर गेली दहा वर्षे प्रयत्नात होते. या भूमिकेला योग्य न्याय देता यावा म्हणून त्यांनी स्वतःच भूमिकेसाठी कास्ट केले होते. दरम्यान जुनं फर्निचर हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बॉक्सऑफिसवर शुक्रवारी फक्त ४० लाखांचा गल्ला जमवता आला. पण शनिवारी आणि रविवारी विकेंडमुळे प्रेक्षकांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतो आहे. काल शनिवारी चित्रपटाने ७२ लाखांचा गल्ला आपल्या खात्यात जमा केलेला आहे. तर आज रविवारचे औचित्य साधून काही ठिकाणी लोकांनी हाऊसफुल्ल गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्वतः महेश मांजरेकर यांनी चित्रपटगृहात हजेरी लावली होती. त्यामुळे दोन दिवसांच्या तुलनेत आजचा कमाईचा आकडा हा अधिक असणार हे खात्रीपूर्वक सांगता येईल. दरम्यान आजच्या कमाईची आकडेवारी ही उद्याच्या अहवालात पाहायला मिळणार आहे. दोन दिवसांत चित्रपटाने १ कोटी १२ लाखांची कमाई केली असली तरी हा आकडा तुलनेने जास्त आहे असे म्हणावे लागेल. पण या आठवड्यात हा चित्रपट लोकांची चांगली पसंती मिळवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.