गेल्या काही दिवसांपासून “आमच्या पप्पानी गणपती आणला” गाण्यावर चिमुकल्याचा धमाल रील सोशल मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. काही दिवसातच या रिल्सला ३२ लाखांचे व्ह्यूव्ह्ज मिळाले. शालेय गणवेशात असलेला हा चिमुरडा गणपतीच्या गाण्यावर कमाल एक्सप्रेशन्स देताना दिसला त्यामुळे त्याचा निरागसपणा प्रेक्षकांनाही विशेष भावला. रिल्स स्टार असलेल्या या चिमुकल्या सोबत सोशल मीडिया स्टार्स आता व्हिडीओ काढण्यास पुढे सरसावली आहेत. या चिमुरड्यासोबत रिल्स बनवून थोडीशी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न इतर रिल्स स्टारकडून केला जात आहे. रातोरात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या सोशल मीडिया स्टार्सचे नाव आहे साईराज गणेश केंद्रे.
टुकुमुकू बघतोय चांगला या ओळीवर साईराजने जे कमाल एक्सप्रेशन्स दिले आहेत ते पाहुन अनेकजण हा व्हिडीओ वारंवार पाहू लागले आहेत. साईराज केंद्रे हा चिमुकला त्याचमुळे रातोरात स्टार बनला आहे. साईराज हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कण्हेरवाडी या गावचा आहे. कण्हेरवाडी येथे असलेल्या इंग्लिश मीडियमच्या शाळेत तो शिक्षण घेत आहे. साईराज हा रील स्टार आहे. त्याची ही कला पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे रिल्स बनवण्यास सुरुवात केली. त्याच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. मात्र आमच्या पप्पानी गणपती आणला या गाण्यावरचा त्याचा व्हिडीओ कमाल घडवून गेला. खरं तर हे गाणं गेल्या वर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं होतं मात्र साईराज हे गाणं तुफान हिट झालं. आता मोठ्यांनादेखील या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरेनासा झालेला आहे. या गाण्याचे खरे गायक आहेत माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे. या दोन बहीण भावंडाने हे गाणं गेल्या वर्षी रेकॉर्ड केलं होतं. त्या गाण्यात या बालगायकांसह त्यांचे आईवडील देखील झळकले आहेत.
या चिमुकल्यांचे वडील आणि काका मंगेश घोरपडे आणि मनोज घोरपडे यांनी मिळून हे गाणं तयार केलं आहे. गीतलेखन आणि दिग्दर्शन घोरपडे बंधूनी केलं असल्याने ते देखील या गाण्याचा महत्वाचा भाग बनले आहेत. मात्र साईराजमुळे त्यांच्या या गाण्याला आता पुन्हा एकदा लोकप्रियता मिळू लागली आहे. साईराज प्रमाणे बालगायक माऊली आणि शौर्याला देखील तेवढीच प्रसिद्धी मिळायला आता हरकत नाही. यंदाच्या गणपती उत्सवात हे गाणं चांगली लोकप्रियता मिळवणार असेच चित्र सध्या दिसत आहे . साईराज 4 वर्षांचा आहे तो आजी आजोबांसोबत राहतो त्याचे आईवडील दोघेही खाजगी कंपनीत काम करत असल्याने बाहेरगावी असतात. अशातच साईराज छोट्यातल्या छोट्या गोष्टी स्मरणात ठेवतो. हनुमान चालीसा त्याला अगदी तोंडपाठ आहे. आणि शाळेत तो भाषणही करतो.