मराठी सृष्टीला सोनेरी दिवस आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून कलाकारांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्णत्वास येताना दिसत आहे. मराठी सृष्टीत खूप कमी पैसे मिळतात अशी नेहमी ओरड पाहायला मिळाली. मात्र आता प्रेक्षकांचा मिळत असलेला पुरेसा प्रतिसाद पाहून मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य सृष्टीला चांगले दिवस येऊ लागले आहेत. या तिन्ही माध्यमातून कलाकार चांगले पैसे कमवू लागले आहेत त्याचमुळे ते आता आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत प्राजक्ता माळी, स्मिता शेवाळे, मीरा जोशी, वर्षा दांदळे यांनी हक्काचं घर खरेदी करून हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.
तर हस्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर हिने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी महागडी गाडी खरेदी केली होती. या सर्वांच्या जोडीलाच आता आणखी एका अभिनेत्रीने ठाण्यात स्वतःचे घर खरेदी केलेले पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री ऋतुजा बागवे. “मी ठाणेकर” असे म्हणत ऋतुजाने तिच्या ठाण्यातील नव्या फ्लॅटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घराची वास्तुशांती करत तिने नव्या घरात प्रवेश केला आहे. ऋतुजा बागवे हिच्या या आनंदाच्या बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ऋतुजा बागवे हिने नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. उत्कृष्ट नृत्यांगना असलेल्या ऋतुजाला नांदा सौख्यभरे या मराठी मालिकेतून प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेनंतर ऋतुजाला मराठी सृष्टीतील दीपिका पदुकोण अशी ओळख मिळाली.
चंद्र आहे साक्षीला, अनन्या अशा मालिका आणि नाटकातून ऋतुजाला महत्वपूर्ण भूमिका मिळत गेल्या. गेल्या दहा वर्षातून अधीक काळ ती या इंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवताना दिसली. या तिच्या प्रवासात यशाचे एक एक टप्पे तिने पार केले. आता आपलं हक्काचं घर असावं अशी तिची इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. “ऋतुजा प्रतिमा राजन बागवे” अशा नावाने घराबाहेर सजलेली तिच्या नावाची पाटी खूप काही सांगून जाते. ठाण्यात आपलं हक्काचं घर झालं या उत्सुकतेने ती आता ठाणेकर झाली आहे हे ती हक्काने सांगताना दिसत आहे. तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी आमच्या समूहाकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.