नदीवर वाळू उचलनारा मी चित्रपटामुळे मला पहिला चेक एवढ्या हजारांचा मिळाला होता.. लग्न होईल की नाही म्हणून आई
सैराट चित्रपटानंतर त्यातील कलाकारांचे संपुर्ण आयुष्यच पालटून गेले. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर त्यांच्याइतकीच तानाजी गळगुंडे, अरबाज शेख आणि सूरज पवार या तरुणांनाही मोठी ओळख मिळवून दिली. प्रदीपच्या भूमिकेने तानाजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पण तानाजीच्या वडिलांनीच अजूनपर्यंत सैराट चित्रपट पाहिला नसल्याची एक मिश्किल प्रतिक्रिया देतो. तानाजी गळगुंडे याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तो आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल भरभरून बोलतो. तानाजी लहान असल्यापासूनच पायाने अपंग आहे. त्याचे हे व्यंग जन्मतःच आहे की जन्मानंतर झालं याबद्दल त्याला फारशी माहीत नाही. पण आठवीत असताना शासनाच्या एका योजनेत त्याच्या पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण त्या उपचाराचा त्याला काहीच फायदा झाला नाही. पायाची हाडं सरळ नसल्याने त्याच्या गुडघ्यात, खुब्यात आणि तळपायात गॅप झाला.
यामुळे वयाच्या २२ व्या वर्षी त्याचे गुडघे खूप सुजायला लागले. त्यामुळे त्याच्या पायावर आजपर्यंत जवळपास ७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत आणि अजूनही मांडीची एक शस्त्रक्रिया करायची बाकी आहे. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजीचे बालपण गावच्या निसर्गाच्या सानिध्यात गेले. आर्थिक परिस्थिती जेमतेम त्यामुळे घरी टीव्ही नसायचा. पण त्याची टीव्ही पाहण्याची आवड पाहून घरी टीव्ही आणण्यात आला. तेव्हा तानाजी रात्री उशिरा जरी लाईट आली तरी टीव्ही बघायला मागेपुढे पाहत नसायचा. अभ्यासाची आवड नसल्याने त्याने कशीबशी १२ वीची परीक्षा दिली. कॉलेज करून आपल्याला कुठे नोकरी मिळणार म्हणून तो शेतीकडे वळला. पण कॉलेजचे लाईफ कसे असते हे त्याला जाणून घ्यायचे होते तेव्हा १ वर्ष गॅप घेतल्यानंतर त्याने पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. एक दिवस कॉलेजच्या लायब्ररीत पेपर वाचत बसला असताना एका मुलाने त्याला दुसरीकडे बसायला सांगितले. म्हणून त्या मुलासोबत त्याचे जोरदार भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की ही बातमी अख्ख्या कॉलेजमध्ये पसरली. तानाजी कोण हे अख्ख्या कॉलेजसह साठे सरांनाही माहीत झाले होते. त्याचवेळी सैराट चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचे काम सुरू होते. साठे सरांनी तानाजीला फोन करून ऑडिशन द्यायला सांगितली. तेव्हा फँड्री चित्रपटामुळे नागराज मंजुळे कोण हे तानाजीला ठाऊक होते. तो लगेच ऑडिशन द्यायला गेला, लूक टेस्ट झाली, पण दहा दिवस झाले तरी त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया मिळाली नाही.
एक दिवस त्याला आपली निवड झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा त्याने आईला चित्रपटात काम करायला जातोय याची कल्पना दिली तर वडिलांना त्याने पुण्यात नोकरीला चाललोय असे सांगितले होते. आपला मुलगा चित्रपटात काम करणार हे कळल्यावर तानाजीच्या आईला पहिली भीती होती की, ‘ती लोकं तुला काम देणार नाहीत तिकडं जाऊन तुझ्या किडन्या काढून घेतील’. पण नागराज मंजुळे यांच्यावर विश्वास असल्याने तानाजी थेट पुण्यात दाखल झाला. सैराट चित्रपटाच्या प्रीमिअरला त्याने आईला आणि मित्रांना बोलावले होते. सैराटमुळे तानाजी प्रसिद्धीच्या झोतात आला. अपंग असलेल्या तानाजीच्या आईला त्याच्या लग्नाची काळजी होती. त्याच्यासोबत कोण लग्न करणार? असा प्रश्न आईला सतत पडलेला असायचा. पण जेव्हा सैराट हिट झाला तेव्हा अनेकजण त्याच्या आईला भेटायला यायचे. त्यातूनच त्याला स्थळं देखील येऊ लागली. हे पाहून आईने तानाजीचे २० व्या वर्षीच लग्न लावण्याचा घाट घातला. पण तानाजीची जिद्द खूप मोठी होती. या प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ न देता त्याने आपल्या गावची शेती सुस्थितीत केली. नदीवर वाळू उचलायला जाणाऱ्या तानाजीला दिवसाचे ३०० रुपये मिळायचे. पण सैराट चित्रपटासाठी त्याला पहिला २५ हजारांचा चेक मिळाला होता. तो त्याने मित्राच्या नावाने त्याच्याकडे दिला होता. मित्राला त्या पैशांची खूप गरज होती म्हणून ते २५ हजार अजूनही त्याने परत मागितले नाहीत. पण त्यानंतर तानाजीला ठिकठिकाणी आमंत्रणं मिळत होती. त्या पैशात त्याने अगोदर शेतीत सुधारणा केली, ठिबक सिंचन केले. आता आपल्याला काम जरी मिळालं नाही तरी मी चांगली शेती करू शकतो असे तानाजी म्हणतो.