ससा, रानडुक्कर, घोरपड खाल्ल्याचं वक्तव्य भोवलं…वन्य प्राणी कोणी उपलब्ध करून दिले म्हणून आता कायद्याच्या कचाट्यात

काही वेळेस आपण केलेलं वक्तव्य हे आपल्याच अंगलट येतं. असाच काहीसा प्रकार आता अभिनेत्री छाया कदम हिच्या बाबतीत झाला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री छाया कदम यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्राण्यांचे मांस खाल्ल्याचे म्हटले होते. मी ससा खाल्लाय, घोरपड, रानडुक्कर असं सगळं खाऊन बघितलंय असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. सोशल मीडियावर त्यांचं हे वक्तव्य जोरदार चर्चेत आल होतं. पण आता यामुळे प्रसिद्धी सोडा छाया कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागत आहे.
या प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ‘प्लांट अँड अनिमल वेलफेअर सोसायटी’ (PAWS) या संस्थेने ठाण्याच्या वन संरक्षक आणि वनविभाग अधिकाऱ्याकडे ही तक्रार दाखल केली आहे. हरीण, ससा, रानडुक्कर, घोरपड या वन्य प्राण्यांच्या संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी छाया कदम यांच्याशी संपर्क साधला असता कायदेशीर सल्ल्या घेऊन त्या या गोष्टीवर बोलणार आहेत. सध्या छाया कदम कामानिमित्त ४ दिवस बिजी आहेत.

ही कामं आटोपल्यावर त्या या चौकशीसाठी हजर राहतील असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान हे वन्य प्राणी कोणी उपलब्ध करून दिले आणि त्यांची शिकार कोणी केली याचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांचीही चौकशी केली जाणार असे वन संरक्षक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.