
दोन ते तीन दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचे वडील धुळ्याच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडले होते. रविंद्र पाटील हे गौतमी पाटीलचे वडील. दुर्गेश चव्हाण यांना धुळ्याच्या रस्त्यावर एक व्यक्ती अंत्यवस्थेत सापडला होता. धुळ्याच्या रुग्णालयात त्यांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर दुर्गेश चव्हाण यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हा व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी फोटो सोशल मीडियावर टाकताच काही तासातच अनेक मेसेजेस त्यांना मिळाले. ते गौतमी पाटीलचे वडील आहेत असे अनेकजणांनी त्यांना सांगितले. ते गौतमी पाटीलचे वडील आहेत हे समजताच ही बातमी व्हायरल झाली. गौतमी पर्यंत ही बातमी लगेचच पोहोचली त्यानंतर गौतमीने माणुसकी दाखवत वडिलांवर उपचार करण्याचे ठरवले यावेळी तिने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर केला होता.

वडिलांच्या मदतीला ती धावून आली होती. वडिलांवर पुण्यात उपचार होतील असे तिने सोशल मीडियावर जाहीर करताच तिच्या वडिलांना पुण्यात आणले गेले. दरम्यान रविंद्र पाटील हे बेवारस अवस्थेत रस्त्यावर पडले होते त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली होती. अजून अर्धा तास जरी उशीर झाला असता तर त्यांचा मृत्यू झाला असता असे डॉक्टरांनी दुर्गेश यांना सांगितले होते. मात्र दुर्गेश चव्हाण यांनी रविंद्र पाटील यांची दखल घेतली आणि ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र आताच हाती आलेल्या बातमीत रविंद्र पाटील यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. रविंद्र पाटील यांची मृत्यूशी झुंज आज अखेर अयशस्वी ठरली. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. धनकवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे सांगितले आहे.

रविंद्र पाटील यांच्या निधनाने गौतमीचे कुटुंब दुखाच्या छायेत आहेत. गौतमी लहान असल्यापासूनच आपल्या आईसोबत राहत होती. आपले वडील कोण हेही गौतमीला माहीत नव्हते. जेव्हा ती आठवी इयत्तेत शिकत होती त्यावेळी तिच्या मामांनी आई वाडीलांचा संसार पुन्हा थाटून देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेल्या गौतमीच्या वडिलांना पुन्हा माय लेकीपासून वेगळे केले गेले. काही दिवसांपूर्वी रविंद्र पाटील यांनी माध्यमांना मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी त्यांच्या हलाकीच्या परिस्थितीचा आढावा दिला होता. आपल्या लेकीने वडील म्हणून हाक मारावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर गौतमीने हा आमचा खाजगी प्रश्न आहे असे म्हणून मीडियाला गप्प केले होते.