ठरलं तर मग ही स्टार प्रवाहची मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेत सध्या रंजक घडामोडी घडत आहेत. प्रियाकडून सत्य जाणून घेण्यासाठी अर्जुन तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करतो आहे. पण यामुळे सायली मात्र चिंतेत पडली आहे. अर्थात तीही या नाटकात सामील असली तरी अर्जुन तिच्या जाळ्यात अडकू नये एवढीच तिला काळजी वाटत आहे. त्याचमुळे सायली या दोघांचा मागोवा घेत अलिबागला जाते. तिथे मात्र अर्जुन आणि प्रिया दोघांना एकत्रित डान्स करताना पाहून सायली अर्जुनवर संतापते. तेव्हा अर्जुन सायलीची मनधरणी करण्यासाठी तिच्या मागे जातो. पण रस्त्यावर एक बाई खाली वाकलेली पाहून सायली तिच्याकडे धावत जाते आणि तिला रस्त्याने येणाऱ्या गाडीपासून वाचवते.
पण या बाईचा चेहरा पाहून सायली अस्वस्थ होते, कारण तो चेहरा प्रतिमा सारखा असल्याचे तिच्या लक्षात येते. मी पाहिलेली बाई प्रतिमा आत्याच होती ते ती अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुन तीला खोटं ठरवतो. पण आता मालिकेच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इतके दिवस सुभेदार कुटुंब प्रतिमाच शोध घेत असतं. प्रतिमा या सगळ्यांपर्यंत कधी पोहोचेल अशीच एक आशा प्रेक्षकांना लागून राहिली होती. पण आता लवकरच या सगळ्यांची प्रतिमाशी भेट घडून येणार आहे. आणि हे काम सायलीच करून दाखवत असल्याने हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे.
मालिकेचा हा महाएपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. या एपिसोडमध्ये सायली प्रतिमाला शोधून आणण्यासाठी घराबाहेर पडते. पण उशिरापर्यंत सायली घरी न आल्याने अर्जुन आणि सुभेदार कुटूंब तिचा शोध घेत असतात. अखेर सायली प्रतिमासोबत सुभेदारांच्या घरात येते तेव्हा अन्नपूर्णा आज्जी प्रतिमाला समोर पाहून खूप खुश होतात. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मालिकेत हा रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. प्रतिमा गायब होण्यामागचे कारण आता मालिकेतून हळूहळू उलगडणार आहे तिथेच सायली हीच तन्वी आहे याचेही सत्य लवकरच सगळ्यांसमोर येवो अशी अपेक्षा आहे.