लग्नाअगोदरच मधुमती देसाईच्या झाल्या निर्मिती सावंत…या कारणामुळे पती महेश सावंत यांनी दिली होती संमती
आज्जीबाई जोरात या नाटकातून निर्मिती सावंत पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करून प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने निर्मिती सावंत यांनी त्यांच्या बालपणीच्या गमतीजमती, मनोरंजन विश्वातील पदार्पण तसेच सुनेसोबतचं बॉंडिंग याबद्दल भरभरून बोललेलं पाहायला मिळालं. निर्मिती सावंत यांना अभिनय हा एकुलता एक मुलगा आहे. तर पूर्वा ही त्यांची सून आहे. पूर्वा ही निर्मिती सावंत यांची स्टायलिस्ट आहे असे म्हटले तर वावगं ठरायला नको. पूर्वा आणि अभिनय हे शाळेपासूनचे मित्र. १२ वर्षांच्या डेटनंतर हे दोघेही विवाहबद्ध झाले होते.
लग्नाअगोदर पूर्वाचे त्यांच्या घरी येणे जाणे असायचे त्यामुळे त्यांचे पूर्वासोबत छान बॉंडिंग जुळून आले. निर्मिती सावंत यांनी लग्नाअगोदरच सासरचे नाव लावण्यास सुरुवात केली होती. त्याला कारणही तेवढेच मोठे होते. निर्मिती सावंत या माहेरच्या मधुमती देसाई. त्यांच्या आई कामगार कल्याणमध्ये नोकरीला होत्या. महिलांसाठी त्या नाटक बसवत असत त्यावेळी मधुमतीही आईसोबत जायच्या. यातूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांच्या वडिलांचा या क्षेत्राला विरोध होता. पण असे असले तरी त्या नाटक, एकांकिकेतून सहभागी होत असत. एका नाटकासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते. ही बातमी त्यांच्या नावासहित वृत्तपत्रात छापून आली होती.
मधुमती देसाई हे नाव त्यांच्या वडिलांनी वाचलं तेव्हा वडील ओरडू नयेत म्हणुन आईने उडवाउडवीची उत्तरं दिली. पण यापुढे असे काही होऊ नये म्हणून मधुमती यांच्या होणाऱ्या नवऱ्याने त्यांना निर्मिती हे नाव लावायचे सुचवले. महेश सावंत हे त्यावेळी नाटकाचे दिग्दर्शन करत असत. एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेमाचे सूर जुळून आले होते. नाटकात काम करायचे म्हणून मधुमती देसाईच्या त्या निर्मिती सावंत झाल्या होत्या. लग्नाअगोदरच त्यांच्या नवऱ्याने हे नाव लावण्याची त्यांना संमती दिली होती.