महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून कलाकारांनी नाव तर कामावलेच पण अनेक स्वप्नांची पूर्तता देखील केलेली पाहायला मिळत आहे. हा शो गेली सहा सात वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कलाकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा शोचा मोठा वाटा आहे. हक्काचं घर ते चार चाकी गाडी ही स्वप्न घेऊन कलानगरीत दाखल झालेल्या या कलाकारांनी एकापाठोपाठ एक स्वप्नांची पूर्तता करून सुखद धक्काच अनुभवला आहे. गेल्या वर्षभरात या शोच्या कलाकारांनी त्यांच्यस हक्काचं घर खरेदी केलेलं पाहायला मिळालं. तर प्रथमेश शिवळकलर आणि नम्रता संभेराव यांनी त्यांच्या गावी दिमाखात शेतघर उभारलं. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही हक्काच्या घरात गृहप्रवेश केला.
पण आता पृथ्वीकने वर्षभरातच पहिली वहिली गाडी खरेदी केल्याचा आनंद शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. हक्काच्या घरानंतर आता गाडीही हवी या विचाराने पृथ्वीक एक एक पाऊल यशस्वीपणे पुढे टाकत आहे. नुकतेच पृथ्वीकने Kia santos ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत साधारण १२ ते १८ लाख इतकी आहे. ही स्वप्नपूर्ती करताना पृथ्वीक त्याच्या आईलाही घेऊन आला होता. आपल्या आईने खूप कष्ट करून मेहनतीने आपल्याला वाढवलं आहे. हक्काच्या घरात एक तिच्यासाठी खास जागा असावी आणि त्या खुर्ची बसून तिने ते सुख अनुभवावं म्हणून पृथ्वीकने आईसाठी एक खास खुर्ची बनवून घेतली होती. आज दुसऱ्या स्वप्नाची पूर्तता आईसोबत अनुभवता यावी म्हणून तो आईलाही गाडी घेण्यासाठी सोबत घेऊन आला.
पृथ्वीक प्रतापने या इंडस्ट्रीत येण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. छोट्या छोट्या भूमिकेतून पुढे आलेल्या पृथ्वीकला महाराष्ट्राची हास्यजत्राने एक मोठी संधी मिळवून दिली. या संधीचं त्यानं सोनं करत शाहरुख खान म्हणून ओळख मिरवली. अर्थात यात त्याच्या सहजसुंदर अभिनयाचीही वाहवा झाली. गेली पाच सहा वर्षे अविरत मेहनत आणि विश्वासाच्या बळावर त्याने हा यशाचा पल्ला गाठला आहे. आधी हक्काचं घर आणि त्यानंतर आता चार चाकी गाडी ही त्याची स्वप्न त्याने सत्यात उतरवली आहेत. या यशस्वी वाटचालीसाठी पृथ्वीक प्रतापला मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.