प्रेक्षकांनी ठरवलं तर एखादा शो हिट करायचा तर तो शो कितीतरी वर्ष टीव्ही माध्यमातून पुढे चालत राहतो पण जर हाच प्रेक्षक एखाद्या शोकडे पाठ फिरवतो तिथे शोला एक्झिट घेण्याशिवाय पर्याय नसतो. असेच काहीसे निलेश साबळेच्या शोच्या बाबतीत घडत आहे. झी मराठीवर निलेश साबळेच्या चला हवा येऊ द्या ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. जवळपास ११ वर्षे हा शो प्रेक्षकांनी उचलून धरलेला पाहायला मिळाला. पण कालांतराने तेच तेच विनोद पाहून प्रेक्षकांना कंटाळा आला. तेव्हा झी वाहिनीनेच प्रेक्षकांच्या निर्णयाचे स्वागत करून चला हवा येऊ द्या ची एक्झिट केली. त्यामुळे निलेश साबळे आणि टीम कुठेतरी गडबडलेली पाहायला मिळाली. अर्थात ज्या शोने या कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली, आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केले त्या शोला असे अचानक निरोप देणे त्यांना रुचले नाही. झी वाहिनीने विश्वासात घेऊन चला हवा येऊ द्या पुन्हा सुरू करू असेही आश्वासन दिले.
पण एवढे दिवस स्वस्थ बसून राहण्यापेक्षा नवीन काहीतरी करावे या विचाराने निलेश साबळेने कलर्स मराठीची ऑफर स्वीकारली. केदार शिंदेने निलेश साबळेला हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो सुरू करण्याची अनुमती दिली. तेव्हा भाऊ कदम, स्नेहल शिदम, ओंकार भोजने सारखे कलाकार त्याला साथ द्यायला आले. २७ एप्रिल रोजी हा शो कलर्स मराठीवर सुरू झाला. चित्रपट, नाटकांचे प्रमोशन या शोच्या माध्यमातून होऊ लागले. पण जे चला हवा येऊ द्या मध्ये होते तेच इथेही पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनी या शोकडे पाठ फिरवली. परिणामी अवघ्या ३ महिन्यातच हसताय ना हसायलाच पाहिजे या शोचा गाशा गुंडाळावा लागला. प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने या शोला आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. कारण कलर्स मराठीवर आता मराठी बिग बॉसची एन्ट्री होत आहे.
हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो सुरू होण्या अगोदरच प्रेक्षकांनी बिग बॉसच्या ५ व्या सिजनची मागणी केली होती. कलर्स मराठीला स्वतःचा टॉपचा शो असताना तो निलेश साबळेला का संधी देतोय? असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले होते. पण केदार शिंदे यांनी वाहिनीची धुरा सांभाळली आणि मालिकांची गणितंच बदलली. अर्थात त्यांनी सुरू केलेल्या इंद्रायणी, अंतरपाट, अबीर गुलाल या मालिकांचे प्रेक्षकांनी स्वागतच केले. पण बिग बॉस यावा अशीही मागणी करण्यात येऊ लागली. त्यामुळे आता हसताय ना हसायलाच पाहिजे, रमा राघव आणि पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिका आणि शोला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे.