तू मागच्या जन्मी माझी बायको होती माझ्या मागेमागे तो घरी येऊ लागला एकदा तर … गर्दीत हात दाखवणं रिंकू राजगुरूच्या आलं अंगलट
प्रत्येक कलाकारांच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्यामुळे तो कलाकार त्याच्या चाहत्याच्या कृतीने भारावून जातो. पण अनेकदा कलाकारांना चांगले अनुभव येतातच असे नाही. पूर्वीच्या काळातही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या चाहत्यांकडून धक्कादायक अनुभव घेतलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच वर्षा उसगावकर यांनी देखील त्यांच्या चाहत्यांचा असाच एक धक्कादायक अनुभव संगीतला होता. हॉटेलमध्ये असताना पहाटेच्या वेळी त्यांचा एक चाहता त्यांना भेटायला आला तेव्हा हा प्रकार पाहून वर्षा उसगावकर खूप चिडल्या होत्या. अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेही एका चाहत्याचा भयानक अनुभव मिडियासोबत शेअर केला होता.
सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. पण ही लोकप्रियता त्यांच्या अंगलट आली होती कारण सैराट चित्रपट हिट झाल्यानंतर या दोघांना घरातून बाहेर पडणं देखील त्रासदायक झालं होतं. कुठे जाईल तिथे त्यांची झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले होते. रिंकू राजगुरू तर कित्येक दिवस स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला या फॅन्स पासून दूर ठेऊ लागली. कुठे जायचे असेल तर तिला बॉडिगार्ड सोबत घेऊन फिरावे लागत होते. याचदरम्यान रिंकुला अनेक ठिकाणी आमंत्रण मिळत होते. तेव्हा प्रत्येकाला भेटणं शक्य नसल्याने ती गर्दीत फक्त हात वर करायची. पण अशाच एका कार्यक्रमात रिंकुला हात वर करणं महाग पडलं होतं. कारण त्यानंतर एक व्यक्ती सतत तिच्या मागावर येऊ लागला होता. हा किस्सा सांगताना रिंकू म्हणते की, मी एका कार्यक्रमात समोर असलेल्या गर्दीकडे हात दाखवला तेव्हा ती व्यक्ती मला भेटायला घरी आली होती.
तिने माझ्याकडे हात दाखवला होता, ती माझ्याकडेच डोळ्यात डोळे घालून बघत होती, तू मागच्या जन्मी माझी बायको होती, तू देवीचं रूप आहेस, तू साक्षात रुख्मिणी आहेस असे म्हणत तो मला लग्नासाठी मागणी घालू लागला. त्यानंतर तो रोज माझ्या घरी येऊ लागला होता. सतत लग्नासाठी मागणी घालू लागला. एकदा तर मी परीक्षा द्यायला गेले तेव्हा बाहेर आल्यानंतर तो समोरच उभा होता त्यावेळी त्याने माझ्यासमोर पैशांचा ढीग लावला. त्यावेळी मी अवघ्या १७ ते १८ वर्षांची होते. हा प्रकार पाहून मात्र मी प्रचंड घाबरून गेले होते. त्यानंतर मग पोलिसांना सांगून त्या मुलाची समजूत घातली. असे म्हणत रिंकूने तिच्या या चाहत्यांचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.