झी मराठी वाहिनीवर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत लवकरच वसुंधरा आणि आकाशच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत. खरं तर हे लग्न आकाशच्या दोन्ही मुलींना अमान्य आहे तर वसुंधरा सुद्धा तिच्या मुलासाठी आकाश सोबत लग्न करायला तयार झाली आहे. पण आता लवकरच आकाशला वसुंधराचं लग्न झालंय आणि तिचा नवरा हयातीत आहे ही बातमी समजणार आहे. कारण वसुंधराचा पहिला नवरा शार्दूलची मालिकेत एन्ट्री होत आहे. मालिकेत शार्दूलच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे सिद्धेश प्रभाकर. सिद्धेश प्रभाकर हा गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीशी जोडला गेलेला आहे.
लहानपणापासूनच तो नाटकातून , सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असे. सिद्धेशला त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. गाजलेल्या मालिकांमध्येही त्याने कधी सहाय्यक तर कधी विरोधी भूमिका निभावल्या आहेत. अग्निहोत्र २, गोल गोल गरा गरा, लग्नाची बेडी, श्रीमंताघरची सून, बावरा दिल, लेक माझी लाडकी, दुहेरी, झपाटलेला २, थोडं तुझं थोडं माझं अशा मालिका, चित्रपट तसेच नाटकातून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीच्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत तो आता विरोधी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत त्याच्या येण्याने कथानकाला वेगळे वळण मिळणार आहे. त्यामुळे शार्दूलबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक असणार आहेत.
पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका हिंदी मालिका पुनर्विवाह या मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेला लोकप्रियता मिळावी यासाठी झी मराठीने अक्षय म्हात्रेला अभिनयाची संधी देऊ केली. एक तगडा नायक म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले कारण अक्षयने मराठी इंडस्ट्रीतुनच पदार्पण केल्यानंतर तो हिंदी मालिका सृष्टीत रमला होता. पण आता झी मराठीने त्याला बऱ्याच प्रतीक्षेनंतर नायकाची भूमिका देऊ केली आणि त्याने हा प्रस्ताव स्वीकारला. आकाश आणि वसुंधरावर प्रेक्षकांनी प्रेम दाखवलं आहे त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे.