चला हवा येऊ द्या नंतर निलेश आता कलर्स मराठीवरील हसताय ना हसायलाच पाहिजे या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खरं तर चला हवा येऊ द्या मधली कलाकारांची टीम पुन्हा एकदा हसताय ना मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. पण या शोमध्ये सागर कारंडे, कुशल बद्रिके, अंकुर वाढवे, श्रेया बुगडे या कलाकारांना प्रेक्षकांनी मिस केलेलं आहे. वाहिनीने जी टीम ठरवून दिली आहे आम्ही त्यांच्यासोबतच काम करतोय असे निलेश साबळेने यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. केदार शिंदे यांनी निलेश साबळेला पुन्हा एकदा ही संधी मिळवून दिल्याने आम्ही आणखी जोमाने काम करायला तयार झालो अशी प्रतिक्रिया त्याने यावर दिलेली पाहायला मिळाली.
चला हवा येऊ द्या सारखाच हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आल्याने लोकांनी या शोला नावं ठेवली. तू द कपिल शर्मा शोची कॉपी केली अशी निलेश साबळेवर टीका करण्यात आली. यावर निलेश साबळेने आता मौन सोडलेले पाहायला मिळत आहे. या टीकेला उत्तर देताना निलेश साबळे स्पष्टच म्हणतो की, ” होय!…मी द कपिल शर्माची कॉपी केली आहे. चांगल्याची कॉपी करायला काय वाईट आहे. कारण मी असं नाही म्हणणार की मला हे झाडाखाली बसून सुचलं मी हे कधीच म्हणणार नाही, हे कपिलनेच केलं होतं तेव्हा ते मला करावसं वाटलं. लई भारी या रितेश देशमुखच्या सिनेमावेळी त्याने मला सांगितलं होतं की पूर्णवेळ सिनेमाचं प्रमोशन तुम्ही करू शकता का? ते रिऍलिटी शोमध्ये प्रमोशन करायला जात होते पण त्यात थोडेच प्रमोशन केले जायचे . त्यामुळे तुम्ही असा शो करू शकता का? असं त्यांनी आम्हाला एक सुचवलं होतं.
त्यातूनच ही कल्पना डोक्यात आली. गेल्या दहा वर्षात मराठी नाटकाला, सिनेमाला या शोचा खरंच खूप फायदा झाला. मोठया मोठ्या लोकांनी आम्हाला फायदा झाला असं सांगितलं सुद्धा. यातूनच जर मराठी इंडस्ट्रीला फायदा होत असेल मराठी इंडस्ट्री मोठी होत असेल , आणि जर यातून काहीतरी चांगलं घडत असेल तर मी ते केलं पाहिजे. त्यामुळे द कपिल शर्मा शोचा फॉरमॅट मला खूप आवडला लोकांनी येऊन जोक्स करावेत, त्यांना न दुखावता त्यांची थोडीशी गंमत करावी, तो एक चटपटीतपणा असायला हवा त्यामुळे मी ही संकल्पना घेऊन शो सुरू करण्याचा निर्णय घेतला.” असे स्पष्टीकरण निलेश साबळेने त्याच्या या शोबाबत दिले आहे.