आज मराठी सृष्टीतून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, लेखक ,दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे आज सकाळी १० वाजता दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी क्षितिज झारापकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला. क्षितिज झारापकर यांना कर्करोगाने ग्रासले होते. गेले कित्येक दिवस ते या आजाराशी तोंड देत होते. उपचाराला प्रतिसाद देतात अशी बातमी अनेक सेलिब्रिटींकडून ऐकायला मिळायची. पण कर्करोगाशी त्यांची झुंज आज ५ मे रोजी अपयशी ठरली. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने कलासृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास क्षितिज झारापकर यांचे पार्थिव त्यांच्या दादर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता शिवाजीपार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
क्षितिज झारापकर यांनी अनेक नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. गोळा बेरीज, आयडियाची कल्पना, धुरंधर भाटवडेकर, हुतात्मा, बायकोच्या नकळतच अशा माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर चर्चा तर होणारच या नाटकातून त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर पाऊल टाकले होते. बायकोच्या नकळतच या नाटकानंतर क्षितिज चित्रपट सृष्टीकडे वळले होते. त्याचदरम्यान त्यांनी नाटकांचे समीक्षक म्हणूनही काम केले होते. चर्चा तर होणारच या नाटकाचे स्क्रिप्ट वाचले आणि त्यांनी रंगभूमीवर पुन्हा पाऊल टाकण्याचे ठरवले होते. त्यानंतर मालिकेतही ते दमदार भुमीकेतून पाहायला मिळाले. स्वराज्य सौदामिनी ताराराणी अशा मालिकेतून त्यांनी ऐतिहासिक भूमिका देखील साकारलेल्या पाहायला मिळाल्या. करूया उद्याची बात हा क्षितिज यांचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ठरला.
त्यांच्यासोबत अनेक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे मराठी सृष्टीतील कलाकारांना क्षितिज यांच्या जाण्याची बातमी कळताच धक्का बसला आहे. अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी क्षितिज यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, काय यार तू खूपच घाई केली यार क्षितीज झारापकर किती वर्षाची ओळख आणि दोस्ती ..सोबत काम करण्यापासून ते माझ्या फिल्म च दिग्दर्शन एवढा प्रवास …वाईट वाटले सुप्रिया चा फोन आला खर वाटले नाही ऐकून .लाला @shreeranga deshmukh ..ने सांगितले तेव्हा मन सुन्न झाले…हुशार तर तू होतास ..मी बाहेर आहे आपली शेवटची भेट पण नाही होणार …काय बोलू यार ..तुझ्या कुटुंबाला बळ ईश्वर देवो ..जीवन अस कसं संपू शकते ..ओम शांती…