माझ्यासारख्या राकट माणसाला ही संधी मिळेल असं वाटलं सुद्धा नव्हतं…पहिल्यांदाच करत असलेल्या कामामुळे प्रवीण तरडे भारावले
प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत प्रेक्षकांच्या मनात त्यांची एक ठराविक इमेज पडलेली असते. अमुक अमुक कलाकार या या भूमिकेत योग्य बसतो किंवा त्याला त्याच भूमिकेत पाहण्याची एक सवय लागलेली असते. कलाकारांचे स्वभावगुणदेखील यावर अवलंबून असतात असे म्हणायला हरकत नाही. चॉकलेट हिरो, रांगडा नायक , विनोदाचा बादशहा, खलनायक अशा पठडीत तुम्ही तुमच्या मनात असलेल्या कलाकाराला बसवता. त्यामुळे छोटा पडदा असो किंवा मोठा त्या कलाकारांना तशाच भूमिका दिल्या जातात. आता प्रवीण तरडेच्या बाबतीत बोलायचं झालं तर चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून निलेश साबळेने त्याची एक इमेज प्रेक्षकांच्या मनात उतरवली आहे. स्ट्रगलच्या काळातही प्रविणने नाट्यसृष्टीत अनेक नवनवीन प्रयोग केले. लेखक, दिग्दर्शक म्हणून तो सतत नविण्याच्या शोधात असलेला पाहायला मिळायचा. अगदी अचानक काहितरी सुचावं तसं तो बवचळायचा.
पण त्याचा हा स्वभावगुण त्याच्या मित्रांना चांगलाच परिचयाचा झाला होता. मैत्री निभवावी ती प्रवीण तरडे याने असेही त्याच्याबाबतीत बोलले जाते. एका शेतकऱ्याचा मुलगा, ‘शेती विकायची नसते ती राखायची असते’ हे त्याने चित्रपटातून दाखवून दिले. त्यामुळे एक रांगडा गडी अशी प्रेक्षकांच्या मनात त्याची एक इमेज तयार झालेली आहे. आणि या इमेजला शोभेल अशीच कामं त्याने केली आहेत. पण आता प्रथमच प्रवीण तरडेला जाहिरात क्षेत्रात झळकण्याची संधी मिळाली आहे. जाहिरात क्षेत्रातला अनुभव नसतानाही प्रविणने ही जाहिरात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एक आगळी वेगळी भूमिका करताना तो स्वतःच भारावून गेलेला पाहायला मिळाला. नुकतेच प्रविणने गोदरेज समृद्धी पशुआहारची जाहिरात केली.
या जाहिरातीत तो उर्मिला कोठारे हिच्यासोबत झळकला आहे. समृद्धी पशुखाद्याचे महत्व पटवून देणारी ही जाहिरात आहे. त्यामुळे माझ्यासारख्या राकट माणसाला कधी अशी जाहिरात मिळेल का याचा विचारही मी कधी केला नव्हता असे प्रवीण म्हणतो. या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करताना प्रवीण म्हणतो की, “पहिल्यांदाच जाहिरात करायला मिळाली….माझ्या सारख्या राकट माणसाला कधी जाहिरात करायला मिळेल असं वाटलं सुध्दा नव्हतं…. धन्यवाद गोदरेज समृध्दी पशु आहार… धन्यवाद शंतनु भाके” असे म्हणत प्रविणने ही जाहिरात मिळवून दिल्याबद्दल शंतनू भाके याचे आभार मानले आहेत.