स्टार प्रवाह वाहिनी गेल्या काही दिवसांपासून नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. साधी माणसं आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेनंतर येड लागलं प्रेमाचं ही मालिका २७ मे पासून प्रसारित केली जात आहे. या तीन मालिकेनंतर आणखी एक चौथी नवीन मालिकेचा प्रोमो उद्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उद्या गुरुवारी सकाळी ७ वाजता ‘थोडं तुझं थोडं माझं’ या नवीन मालिकेचा पहिला वहिला प्रोमो लॉन्च केला जाणार आहे. ‘ती परत येतेय…’ , ‘फक्त २४ तास बाकी’ असे म्हणत स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढवली आहे. गेल्याच महिन्यात या मालिकेचे टायटल सॉंग रेकॉर्ड करण्यात आले होते. आर्या आंबेकर आणि नचिकेत लेले या गायकांनी हे टायटल सॉंग गायले आहे. वैभव जोशी यांनी या गीताचे लेखन केले असून अविनाश विश्वजित यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केलं आहे.
दरम्यान थोडं तुझं थोडं माझं अशा धाटणीची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे गेल्याच महिन्यात जाहीर झाले होते. पण प्रोमो समोर न आल्याने या मालिकेत कोण झळकणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र यामागचा पडदा उद्या प्रोमो मधून हटवलेला पाहायला मिळणार आहे. पण त्याअगोदरच या मालिकेचे नाव रिव्हील करण्यात आले आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतून छोट्या पडद्यावर कम बॅक करत असल्याने दिसून येणार आहे. देवयानी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली शिवानी सुर्वे अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकली. मराठी बिग बॉस नंतर ती बऱ्याचदा चित्रपटातच रमलेली पाहायला मिळाली. काहीच दिवसांपूर्वी तिने अजिंक्य ननावरे सोबत लग्नगाठ बांधली होती. पण आता लग्नानंतर शिवानी पुन्हा एकदा मालिका सृष्टीकडे वळलेली आहे. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतून ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार असे बोलले जात आहे.
दरम्यान शिवानी सुर्वे देवयानी या स्टार प्रवाहच्या मालिकेनंतर पुन्हा याच वाहिनीवर प्रमुख भूमिका निभावताना दिसणार आहे त्याचमुळे ‘ती परत येतेय’ असे कॅप्शन तिच्यासाठी अधोरेखित करण्यात आले आहे. शिवानी सुर्वे हिच्या नावाच्या जोडीला ज्ञानदा रामतीर्थनकर हिच्याही नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. पण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेत शिवानी सुर्वेलाच संधी मिळणार असे खात्रीपूर्वक म्हटले जात आहे. उद्या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमधून याबाबत अधिक स्पष्टीकरण मिळणारच आहे. त्यामुळे उद्याच्या प्रोमोची आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.