ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर पदवी रद्द…लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना किन्नर आखड्यातून दिला डच्चू

महाकुंभ मेळाव्यात अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली होती. त्यामुळे ममता कुलकर्णीने संन्यास घेतला असल्याची एकच चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली. किन्नर आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी हिला ही पदवी दिली होती. पण या नंतर किन्नर आखड्यात एकच विरोध पाहायला मिळाला. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदवी देऊ नये असे किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी म्हटले. त्यामुळे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि ऋषी अजय दास यांच्यात एकच वाद निर्माण झाला.

अजय दास यांनी एक परिपत्रक जाहिर करून लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णीला किन्नर आखड्यातूनच डच्चू देण्यात आल्याचे सांगितले आहे. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखड्यातून हकालपट्टी करण्यात आली असून ममता कुलकर्णी हिला देऊ केलेली महामंडलेश्वर ही पदवी त्यांनी रद्द केली आहे. पण यावरून लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीच ऋषी अजय दास यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘अजय दास यांना अगोदरच किन्नर आखड्यातून बाहेर काढले होते. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने आम्हाला बाहेर काढतायेत?’ असा प्रश्न लक्ष्मी नारायण यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान अजय दास यांनी एका परिपत्रकात म्हटले आहे की, ‘ २०१५-१६ साली लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदवी देण्यात आली होती. ज्या उद्देशासाठी त्यांना ही पदवी देण्यात आली होती त्या उद्देशापासूनच त्या दूर जात आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून ही पदवी काढून घेत आहोत. ग्लॅमरस दुनियेत वावरत असलेल्या ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर पदवी दिली गेली यामुळे सनातन धर्माचा उद्देशच धुळीला मिळवण्याचा इथे प्रयत्न केला गेला. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या विरोधात हा कडक निर्णय घ्यावा लागला आहे. असे स्पष्टीकरण ऋषी अजय दास यांनी दिलं आहे.