
छावा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास १० दिवस झाले आहेत. मात्र प्रेक्षकांकडून दुसऱ्या आयहवड्यातही या चित्रपटाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात तर प्रेक्षकांची चित्रपटगृह हाऊसफुल्ल केले आहेत. हा चित्रपट तेलुगू भाषेमधून पाहायला मिळावा अशी मागणीही केली जात आहे. आतापर्यंत १० दिवसांत चित्रपटाने ३२६.७६ कोटींचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमवला आहे. अशातच चित्रपटाचा एक डिलीट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हा सीन का डिलीट केला? अशी विचारणा केली आहे. अभिनेत्री दिव्या दत्ता हिने या चित्रपटात सोयरामातोश्रींची भूमिका साकारली आहे. तर अभिनेते आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे. या दोघांमध्ये एक संवाद होतो तो थिएटर मध्ये प्रेक्षकांना दाखवण्यात आला नव्हता. हा सीन पाहून अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एवढा दमदार सीन असूनही चित्रपटातून हा सीन का वगळला? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. दरम्यान या चित्रपटामुळे दिव्या दत्ता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत.

या भूमिकेसाठी आपली प्रशंसा होतेय , लोकांना आपली भूमिका आवडते हे पाहून त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. छावा चित्रपटात अनेक मराठी कलाकारांना संधी मिळाली आहे. छोट्या छोट्या भूमिकेने आपले हे मराठी कलाकार प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करताना दिसत आहेत. पण विकी कौशलच्या अभिनयाला तोड नाही अशी प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवत नाही. त्यात असे दमदार सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.