स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच आणखी एक नवी मालिका दाखल होत आहे. या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीने अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या मालिकेनंतर येड लागलं प्रेमाचं या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली त्यानंतर या मालिकेत पूजा बिरारी आणि विशाल निकम प्रमुख भूमिका साकारणार हे स्पष्ट झाले. पण आता स्टार प्रवाह वाहिनी “थोडं तुझं थोडं माझं!” ही आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांसमोर आणत आहे. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच रेकॉर्ड केले गेले आहे.
गीतकार वैभव जोशी यांनी हे शीर्षक गीत लिहिलं असून अविनाश विश्वजित यांनी त्याला संगीतबद्ध केलं आहे. गायिका आर्या आंबेकर नचिकेत, लेले यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. आर्या आंबेकर हिच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा मालिका सृष्टीत गाजणार असे या शिर्षकावरून प्रेक्षकांनी म्हटलं आहे. दरम्यान थोडं तुझं थोडं माझं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आणि त्यात कोणकोणत्या कलाकारांना संधी मिळणार हे अजून वाहिनीने गुलदस्त्यात ठेवलं आहे. पण मालिकेच्या शिर्षकावरून तरी ही मालिका एका खट्याळ प्रेमाची असणार हे स्पष्ट होत आहे.
येड लागलं प्रेमाचं ही मालिका पुढच्या महिन्यात टेलिकास्ट होत आहे. २७ मे रोजी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे अबोली या मालिकेला आटोपते घ्यावे लागत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. अबोली या मालिकेच्या जोडीला आता आई कुठे काय करते या मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घ्यावा असे म्हटले जात आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या बाबतीतही असेच काहीसे बोलले जात आहे. इतके दिवस होऊनही मंजुळा आणि वैदेहीच्या बाबतीतील सत्य अजून मल्हारसमोर न आल्याने मालिका खूपच हळुवार पुढे सरकताना दिसत आहे. त्यामुळे या मालिकेनेही लवकरात लवकर आटोपते घ्यायला हवे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.