संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या नियम व अटी लागू या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात गेला आहे. तर आज त्याचा अभिनित केलेला तीन अडकून सीताराम हा चित्रपट सुद्धा रिलीज होत आहे. त्यामुळे संकर्षण सध्या प्रसिद्धीच्या झोतात आलेला पाहायला मिळतो आहे. एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट करणारा संकर्षण हा आता अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आम्ही सारे खवय्ये पासून त्याच्या सुत्रसंचालनाचे प्रेक्षकांना विशेष कौतुक वाटले आहे. अभिनेता, कवी आणि सूत्रसंचालक अशा विविधांगी भूमिकेतून सकर्षणच्या कलागुणांचे दर्शन झाले आहे. या प्रवासात त्याला काही चांगले तर कधी वाईट अनुभव देखील मिळाले. अशातच या नाटकानिमित्त झालेल्या परदेश दौऱ्यात संकर्षणला अविस्मरणीय अनुभव आले.
काही दिवसांपूर्वीच संकर्षणने त्याच्या विमान प्रवासात पुढे केबिनमध्ये बसलेल्याचा सुखद अनुभव सांगितला होता. परदेशी लोकंही न बोलताच आपल्या भावना जाणून घेतात आपल्याशी आपुलकीने कसे वागतात हा त्याचा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र कालचा त्याचा एक अनुभव त्याला सुखद धक्का देणारा ठरला. स्ट्रगलच्या काळात संकर्षणला आम्ही सारे खवय्ये या शोने चांगली साथ दिली होती. हा शो सुरू झाला त्याचा पहिला भाग ज्या महिलेसोबत केला त्या महिला म्हणजेच काकू संकर्षणला चक्क अमेरिकेत भेटल्या. तब्बल १२ वर्षानंतर काकुला पुन्हा एकदा समोर पाहून संकर्षण पुरता भारावून गेला होता. आयुष्यात कधी असे प्रसंग घडतील याचा कधीच त्याने विचार केला नव्हता. या अनुभवाबद्दल संकर्षण म्हणतो की, “माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण…” Please वाचा आज अमेरिकेतला डॅल्लस चा प्रयोग जोरदार झाला.. प्रयोगानंतर एक काकु काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव “उत्तरा दिवेकर”
ह्या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबाग ला मी २०११ साली माझा “आम्ही सारे खवय्ये” चा पहिला भाग शूट केला होता.. योगायोगाने त्या सिजन चं नाव होतं “आई मला भूक लागलीये”.. आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” ईतकं भरून आलं मला …. कलाकाराला काय हवंय..? हेच .. हेच.. आज १२ वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय…. ”खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली , अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक “आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत आणि आज “नियम व अटी लागू नाटकाच्या निमित्ताने भेट झाली …. THANK YOU THANK YOU आणि हो ; आजपासून आमचा सिनेमा रिलिज होतोय .. महाराष्ट्रात.. “तीन अडकून सीताराम” चित्रपटगृहात जाउन नक्की बघा ..”