मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी ही आता विविध माध्यमातून लोकांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत आहेत. कोरोनाच्या काळातही कलाकारांनी एकत्र येऊन अडचणीत सापडलेल्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला होता. एवढंच नाही तर कुठे दरड कोसळून जीवित हानी झाली असेल किंवा आजारपण असेल त्यांच्या मदतीला सुद्धा हे कलाकार आता धावून येताना दिसत आहेत. गेल्याच वर्षी दरड कोसळलेल्या इर्शालवाडी गावातील लोकांना या कलाकारांनी जमेल तशी मदत पाठवली होती. तर आता अडचणीत सापडलेल्या एका कलाकाराला खुद्द निलेश साबळे यानेच मदतीचा हात पुढे देऊ केलेला आहे. निलेश साबळे स्वतः काही स्वरूपाची मदत या कलाकाराला करत आहे तसेच त्याने प्रेक्षकांनाही एक मदतीचे आवाहन केले आहे.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत झळकलेले अतुल वीरकर तुम्हाला आठवत असतील. त्यानंतर “येऊ कशी मी नांदायला” आणि “चला हवा येऊ द्या” मध्ये ते झळकले. सध्या ते ठाण्यात सेलिब्रिटी चायवाला या नावाने त्यांचा फूडट्रक चालवत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अतुल वीरकर यांचा मुलगा प्रियांश वीरकर याच्या आजाराबद्दल अनेकांना कल्पना देण्यात आली होती. प्रियांशला “अॅलन हेरडनन डडली सिड्रोम AHDS” हा दुर्मिळ आजार आहे. या आजारावरील उपचार खर्च खूप मोठा असल्याने अतुल वीरकर यांनी सोशल मीडियावर अनेकांकडून आर्थिक मदत मागितली होती. त्यांना वेळोवेळी तशी मदत मिळाली देखील त्यामुळे प्रियांशवर उपचार करण्यात त्यांना यश आले. पण आता प्रियांशसाठी त्यांना एक वॉकर घ्यायचा आहे आणि त्याची किंमत बऱ्यापैकी मोठी आहे.
परदेशातून हा वॉकर आणायचा असल्याने निलेश साबळे यांनी जनतेला एक मदतीचे आवाहन केले आहे. येत्या ३० जून रोजी रात्री ८.३० वाजता ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात “ऑल द बेस्ट” नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकातून मिळणारा मोबदला प्रियांशच्या वॉकर खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे एक तिकीट प्रियांशसाठी अशी एक मोहीम या नाटकाच्या मार्फत राबवण्यात आली आहे. स्वतः निलेश साबळे देखील या नाटकाचे तिकीट खरेदी करून प्रियांशला मदत करणार आहेत. तसेच ठाणेकरांनाही त्याने हे तिकीट खरेदी करण्याचे आवाहन केलेले आहे जेणेकरून अतुल वीरकर यांना आर्थिक मदत होईल. ज्यांना कोणाला तिकीट खरेदी करून मदत करावीशी वाटते त्यांनी अतुल वीरकर यांच्याशी संपर्क साधावा.