झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत सात वर्षांचा लिप घेण्यात आला आहे. या एवढ्या वर्षांच्या लिपमुळे मालिकेत अनेक बदल घडून आले आहेत. यामुळे मालिका अधिक रंजक झाली आहे. अप्पी आणि अर्जुन दोघांचे वाद झाल्यामुळे ते दोघेही वेगवेगळे राहू लागले आहेत. त्यात त्यांचा मुलगा अमोल आता त्या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याचा मधला दुवा बनणार आहे. त्यामुळे मालिकेचे कथानक आता अमोल भोवतीच फिरताना दिसत आहे. हा चिमुरडा सिम्बा साकारणारा बालकलाकार जेव्हा अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत एन्ट्री घेणार हे कळताच प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. आमच्या पप्पाने गंपती आणला या एका रील मुळे साइराज केंद्रे हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते.
त्यावेळी हा चिमुरडा निरागस हावभावामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. आता तो मालिका सृष्टीत पदार्पण करणार हे पाहून सगळ्यांनी त्याचे कौतुकही केले. पण आता हाच साइराज अभिनय सृष्टीत मात्र प्रेक्षकांना नाराज करून गेला. अर्थात अभिनयाचे कुठलंही प्रशिक्षण न घेता साइराज मालिकेत एन्ट्री करताना दिसला त्यात तो काय बोलतो हेही स्पष्ट कळत नसल्याने प्रेक्षकांनी त्याच्यावर नाराजी दर्शवली आहे. साइराज एक गुणी मुलगा असला तरी त्याला अजून कॅमेरा कसा फेस करायचा याचा अनुभव नाहीये. शिवाय तो एवढासा चिमुरडा अजून स्पष्ट बोलुही शकत नसल्याने मालिकेत त्याला का घेतले असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. ही त्याची सुरुवात जरी असली तरी त्याच्या प्रसिद्धीकडे पाहूनच मालिकेत त्याला काम दिले आहे अशी त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.
पण पुढे हळूहळू त्याला कॅमेऱ्याची सवय झाल्यावर तो त्यात नक्कीच सुधारणा करेल हेही तितकंच खरं आहे. सोशल मीडिया वरील अभिनय आणि कॅमेऱ्यासमोर उभा राहून केला जाणारा अभिनय ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. अनेक सोशल मीडिया स्टार अनेक मालिकांत एन्ट्री घेताना पाहायला मिळतात पण त्यांना मुळात अभिनय क्षेत्रातील माहिती नसल्याने ते सफशेल फेल ठरतात हे आपण अनेकदा पाहिलं आहे. विनायक माळी ह्या सोशल मीडियास्टार च्या बाबतीत देखील असच घडलेलं पाहायला मिळालं होत.