अभिनेत्री सई रानडे हिने मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या ती बरसातें या हिंदी मालिकेतून महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. मॉडेलिंग करत असताना सईला मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली होती. वहिनीसाहेब, देवयानी अशा मालिकांमधून तिने विरोधी भूमिका साकारल्या होत्या. मालिकेत काम करत असतानाच सई ठाण्याला राहायला आली. ती जिथे राहत होती तिथेच तिची सलील साने सोबत ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. सईची सासू ही देखील अभिनेत्री आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. मेघना साने या सईची सासू आहेत. मेघना मेढेकर यांनी संगीतकार हेमंत साने यांच्याशी लग्नगाठ बांधली. मेघना साने यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
कोवळी उन्हे हा त्यांनी स्वतः लिहिलेला तसेच आयोजित केलेला कार्यक्रम खूप गाजला होता. त्यांच्या स्वतःच्या युट्युब चॅनलवर त्यांनी पती हेमंत साने यांच्यासोबत विडंबनात्मक गीतं सादर केली होती त्याला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दिल की आवाज हा हिंदी गीतांचा कार्यक्रम हे दोघेही आयोजित करत असतात. आजवर चित्रपट, मालिका अशा माध्यमातूनही मेघना साने यांनी काम केलं आहे. सध्या नाशिकच्या रेडिओ विश्वासवर त्या अनेक मान्यवरांची मुलाखत घेण्याचे काम करत आहेत. मेघना साने यांनी तो मी नव्हेच, लेकुरे उदंड झाली, मिट्टी, लढाई या नाटक आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. ४५ लेखकांनी एकत्र येऊन ‘मधूबन’ हे पुस्तक लिहिले या पुस्तकाच्या संपादिका म्हणून मेघना साने यांनी जबाबदारी सांभाळली होती.
सईची सासू म्हणजेच मेघना साने यांची सख्खी बहीण शर्मिला मेढेकर कुलकर्णी यासुद्धा अभिनेत्री आहेत. १९८४ साली माझं माहेर या चित्रपटात शर्मिला यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. ये अबोली लाज गाली…, कळले काही तुला, कळले काही मला… अशी गाजलेली गाणी शर्मिला कुलकर्णी यांच्यावर चित्रित झाली आहेत. घाबरायचं नाही, सोम मंगल शनी अशा चित्रपटात त्यांनी काम केले होते.मराठी चित्रपट निर्माते सतीश कुलकर्णी यांच्याशी शर्मिला यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सईची सासरची मंडळी कला क्षेत्रातच सक्रिय असलेले पाहायला मिळतात.