प्रत्येकासाठी आयुष्य हे सारखं नसतं आयुष्यात घडलेल्या घटनांनी … नवरी मिळे हिटलरला मालिकेतील लीलाची आई अजूनही सिंगल
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला आणि अभिरमच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. या मालिकेत लीलाच्या आईची भूमिका अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी साकारली आहे. शीतल क्षीरसागर यांनी आजवर अनेक मालिका केल्या आहेत त्यात त्यांनी खलनायिकेची भूमिका गाजवलेली पाहायला मिळाली. रमा राघव, माझी तुझी रेशीमगाठ, अधुरी एक कहाणी, का रे दुरावा या मालिका त्यांनी सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. वयाच्या ५ व्या वर्षीच त्यांनी आपल्याला अभिनय क्षेत्रात यायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे शाळेतूनच सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग दर्शवला होता. नाटक, मालिका, चित्रपट असा त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु आहे. मालिकेत नायक नायिकेची आई साकारणाऱ्या शीतल यांनी अजूनही खऱ्या आयुष्यात लग्न केलं नाही हे जाणून अनेकजण आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत असतात.
या अनुभवाबद्दल त्यांनी मीडियाला एक मुलाखत दिली आहे. त्यात अजूनही लग्न झालं नाही म्हणून टोमणे खावी लागतात अशी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्या म्हणतात की, “आयुष्यात ज्या घटना अनुभवलेल्या असतात तशाच काही घटना आम्ही कॅमेऱ्यासमोर जगत असतो. यातूनच कधीकधी मला कॅरेक्टरविषयी कल्पना सुचतात. प्रत्येकासाठी आयुष्य हे सारखं नसतं.तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य मोजूमापू शकत नाहीत. मला अनेकजणांनी इकडचे तिकडचे स्थळं सुचवली आहेत. पण मी ह्या गोष्टी एन्जॉय करते, याचा मला कधीच राग येत नाही. रस्त्यात मला आजीबाई जेव्हा विचारतात तेव्हा मी लग्न झालं नाही हेच सांगते. तेव्हा त्या ‘काय? ‘ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया देतात. ‘एवढी छान तर दिसतेस मग अजून लग्न का नाही केलं?’ असे प्रश्न ते विचारतात. मला असं वाटतं की यामागे त्यांचे काही ठोकताळे असतात. ते तसं घडत नसलं की समोरच्यात काहितरी कमी आहे असंच त्यांना वाटतं.
सुखी आयुष्याची व्याख्या काय तर एवढ्या वयात शिक्षण, लग्न, करिअर, मुलं, फार्महाऊस हे ठोकताळे प्रत्येकाच्या आयुष्यात तसेच घडत नसतात. पण ह्याच चष्म्यातून तुमच्याकडे पाहिलं जातं तेव्हा तुम्ही अपयशी ठरता. पण मला असं वाटतं की, प्रत्येकाला त्याच्या आयुष्याची प्रत ठरवण्याचा अधिकार आहे. पुरुष महिला सगळ्यांनाच ह्या गोष्टी लागू होतात पण मी माझं आयुष्य एन्जॉय करते त्यात लोनलीनेस अजिबात नाहीये. ” शीतल क्षीरसागर यांनी या मुलाखतीत आयुष्याचा जोडीदार कसा हवा याबद्दलही एक खुलासा केला आहे. त्या म्हणतात की, “छान दिसणारा, वेल सेटल असलेला असावा, समजून घेणारा असावा, त्याचं माझ्या आयुष्यात येण्याने आणि माझं त्याच्या आयुष्यात येण्याने जीवनात अर्थ मिळावा ,असा मला एक मित्र हवा आहे. ” असे आयुष्यातील जोडीदाराबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं आहे.