बाबा आनंदी तुमची बायको आहे ना….प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच कश्यपने लेकी बाबद उचलल हे पाऊल
बालमनावर जे संस्कार होत असतात ते दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे चांगले किंवा वाईट या गोष्टींची जाणीव त्यांना याच वयात करून द्यावी लागते. महत्वाचं म्हणजे टीव्ही हे एक असे माध्यम आहे ज्याचा परिणाम लहान मुलांवर लवकर होत असतो त्यामुळे आताचे बरेचसे पालक आपल्या मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवताना दिसतात. असाच काहीसा अनुभव कश्यप परुळेकर यानेही घेतला आहे. आपली मुलगी या गोष्टीत जरा जास्तच इंव्हॉल्व्ह होतेय हे पाहून कश्यपने चक्क त्याच्या ५ वर्षाच्या लेकीला त्याच्याच मालिकेपासून दूर ठेवले होते. नुकतेच झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील राघव, आनंदी, चिंगी, रमाचे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर या मालिकेमुळे कश्यपला एक चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.
यात त्याने राघवचे पात्र साकारले होते. पण कश्यपची मुलगी इरा ही या मालिकेत खूपच इंव्हॉल्व्ह होत होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कश्यपने हा खुलासा केला आहे. तो आपल्या या मालिकेबद्दल सांगतो की, “माझी मुलगी या मालिकेत खूपच इंव्हॉल्व्ह व्हायला लागली होती. तिने असा समज करून घेतला होता की पल्लवी माझी बायको आहे..ती मला म्हणाली की, बाबा आनंदी तुमची बायको आहे ना …तर मी तिला नाही असं म्हणालो, आनंदी ही राघवची बायको आहे, पण मी राघव नाही मी आता तुझा बाबा आहे की नाही. माझी बायकोच तुझी आई आहे. तर यावर ती मला म्हणाली की, नाही ती माझी आई आहे पण तुमची बायको आनंदी आहे.” सुरूवातिला लेकीच्या या गैरसमजावर काय उत्तर द्यावं हेच कश्यपला समजत नव्हतं. तो म्हणतो की, ” ती ह्या गोष्टी खूप खऱ्या समजायला लागली होती. ती सध्या पाचच वर्षांची आहे त्यामुळे मी तिला माझी मालिका दाखवणं बंद केलं.” त्याचवेळी पल्लवी पाटील याच मालिकेतील आणखी एक किस्सा सांगताना म्हणते की,” एकदा आनंदी मुंबईत गणपती बघायला जात असते.
त्यावेळी आनंदी त्या मुंबईच्या गर्दीत हरवते. या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटलं होतं, त्यावेळी ती खूप रडलीसुद्धा होती. तिने कश्यपला आनंदीला शोधून आणा म्हणून सांगितले होते. या गोष्टीत ती खूपच इंव्हॉल्व्ह होत होती” . असे म्हणताच या प्रकरणाचे गांभीर्य कश्यपच्या लक्षात येऊ लागले होते. तो म्हणतो की, ” मी ह्या गोष्टी मालिकेच्या सेटवर येऊन शेअर करायचो. मला आनंदीला भेटायचंय, चिंगीला भेटायचंय असे ती म्हणत होती, आनंदीवर तुम्ही का ओरडला? तुम्ही खूप वाईट आहात असंही ती म्हणायची तेव्हा सगळ्यांनी मला तिला या मालिकेपासून दूर ठेवायला सांगितले. ती जर ह्या गोष्टीत एवढी इंव्हॉल्व्ह होत असेल तर तिला त्याच्यापासून दूर ठेवलेलंच बरं म्हणून मी तिला माझी मालिका दाखवत नव्हतो. “