
डिसेंबर महिना हा मराठी सेलिब्रिटी विश्वासाठी खूपच खास ठरला आहे . कारण या वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी लग्न गाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. आज शनिवारी २३ डिसेंबर राजी गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांच्या मेंदीचा सोहळा पार पडला. तर तिकडे स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचाही मेंदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. आजच्याच दिवशी अभिनेत्री प्रतिमा देशपांडे हिनेही लग्नगाठ बांधून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. प्रतिमा देशपांडे ही गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहे. सन मराठीवरील संत गजानन शेगावीचे या मालिकेत तिने जानकीची भूमिका गाजवली होती. पाटील चित्रपटातही प्रतिमाने प्रमुख भूमिका साकारली होती.

याशिवाय प्रतिमा एक युट्युबर देखील आहे. तिच्या युट्युबवर ती भारतभर भ्रमंती करत त्याचे व्हिडीओ युट्युबवर शेअर करत असते. तिच्या या ट्रॅव्हल व्ह्लॉगला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो याचमुळे प्रतिमा अभिनय क्षेत्र बाजूला सारून भरतभ्रमंती करत असते. अशातच सप्टेंबर महिन्यात ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत गिरनार पर्वतावर गेली होती. तिथल्या दत्त मंदिरात प्रतिमा देशपांडे आणि समीप परांजपे यांनी अतिशय साधेपणाने छोटासा साखरपुडा केला होता. त्यानंतर आता आज २३ डिसेंबर रोजी प्रतिमा आणि समीपने मोठ्या थाटात लग्न केलेले पाहायला मिळत आहे. प्रतिमा ज्याच्याशी विवाहबद्ध झाली तो समीप तिचा कॉलेजपासूनचा मित्र आहे. समीप हा आर्किटेक्ट असून तोही प्रतिमासोबत ट्रॅव्हलिंगचे व्हिडीओ बनवत असतो.

याशिवाय फॉनिक्सआर्किटेक्ट इंडिया या नावाने त्याचा बिजनेस देखील आहे. प्रतिमा ही कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करत होती. तिने नृत्याचे देखील धडे गिरवले आहेत. अजूनही बरसात आहे, शुभमंगल ऑनलाइन अशा मालिकांमधून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नाटक मालिका अशा प्रवासात तिला पाटील सारख्या चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण युट्युबवर म्हणून सध्या तिचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्याव्यतिरिक्त ती याही क्षेत्रात जम बसवू पाहत आहे. तूर्तास प्रतिमा देशपांडे आणि समीप परांजपे या नवविवाहित दांपत्याला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.