तिला वाटत असेल आपला खून करावासा किंवा आपल्यालाही वाटत असेल तिचा खून करावासा…श्वेता शिंदेचे सासूबद्दलचे वक्तव्य चर्चेत
एक उत्तम अभिनेत्री तसेच एक यशस्वी निर्माती म्हणून श्वेता शिंदे हिच्याकडे पाहिले जाते. श्वेता शिंदे हिच्या नवऱ्याचा कपड्यांचा, साड्यांचा व्यवसाय आहे त्यामुळे ती एक उद्योजिका म्हणूनही ओळखली जात आहे. प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन देण्याच्या ती शोधात असते. यातूनच देवमाणूस आणि लागीरं झालं जी या मालिका तिने लोकप्रियतेच्या शिखरावर नेल्या. जे करायचं त्या निर्णयावर ती ठाम असते. देवमाणूस या मालिकेसाठी तिने झी मराठीकडे प्रस्ताव ठेवला होता. मात्र वेळ नसल्या कारणाने तिला अनेकदा नकार मिळाला. पण एक दिवस फक्त दहा मिनिटे द्या असे म्हणत तिने देवमाणूस या मालिकेची संकल्पना समोर मांडली तेव्हा झी मराठी कडून लगेचच यावर मालिका होईल असे तिला आश्वासन मिळाले. लागीरं झालं जी या मालिकेच्या बाबतीतही तिला असाच अनुभव मिळाला.
समोरची व्यक्ती आपल्याला नाही म्हणाली म्हणजे तो आपल्यासाठी होकार असतो असे ती मानते आणि आपल्याला जे हवंय ते ती हात धुवून मागे लागून करून घेतेच . कसम परेड शूट करणं हे हिंदी मालिकेसाठीही खूप मोठे आव्हान असते पण श्वेता शिंदेने तिच्या स्वतःच्या विश्वासावर ही कसम परेड थेट दिल्लीत शूट केली होती . हा किस्सा श्वेता शिंदेने एका मुलाखतीत सांगितला आहे. लागीरं झालं जी या मालिकेवेळी कसम परेड शूट करण्यासाठी तिने दिल्ली साऊथ ब्लॉकला खूप फेऱ्या मारल्या. तिथले अधिकारी दरवेळी तिला परवानगी द्यायला नाही म्हणायचे. पण तरीही श्वेता शिंदे त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जायची. शेवटी कंटाळून त्यांनी श्वेताला १० मिनिटे दिली या दहा मिनिटात तिला सिद्ध करून दाखवायचे होते की ती त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करून दाखवते. त्या दहा मिनिटात श्वेताने प्रेझेंटेशन दिले त्यात तिने मिलिटरी अपशिंगे गावातील एक उदाहरण दिले की ‘तिथल्या प्रत्येक घरातील एक व्यक्ती आर्मीमध्ये आहे .माझ्या शोचा हिरो हा ऑफिसर नाही तर तो आर्मी जवान आहे. आर्मी जवान ची ही लव्हस्टोरी आहे त्यांना मुली मिळत नाहीयेत लग्नासाठी, मला त्यांना हिरो करायचं आहे’ असे म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांनी कसम परेडच्या शूटिंगला परवानगी दिली होती.
या मुलाखतीत श्वेता शिंदेने तिच्या खाजगी आयुष्यबद्दलही एक खुलासा केला. हिंदी मालिका अभिनेता संदीप भन्साळी ह्याच्याशी श्वेताने प्रेमविवाह केला. सध्या संदीप भन्साळी हे ग्लॅमरस दुनियेपासून खूप दूर आहेत पण पुणे आणि साताऱ्यात त्यांचा होलसेल साड्यांचा बिजनेस आहे. श्वेता शिंदे पिरंगुट येथे तिच्या कुटुंबासोबत राहते. मुलगी, नवरा, सासू, सासरे, दिर, जाऊ , पुतणे असे त्यांचे १० जणांचे एकत्र कुटुंब आहे. या एकत्र कुटुंबात तिला राहायला खूप आवडते. लग्नाननंतर सासूसोबत एकत्र राहण्यावर तिचं मत आहे की, ‘ प्रत्येक लग्नात तुम्ही तुमच्या सासुसोबत सुरुवातीचे तीन वर्षे व्यवस्थित सांभाळून घालवले की तुम्हाला आयुष्यात पुढे कशाचीच काळजी नसते. मला कायम असं वाटतं की आपली सासू आपल्यासोबत कशी का असेना म्हणजे जर तिला वाटत आले की आपला खून करावा किंवा आपल्याला वाटत असेल की तिचा खून करावा म्हणजे ह्यापेक्षा वाईट काय असू शकत? असं जरी तुमचं नातं असेल तरी तुमचं जे मूल असतं त्या मुलांकडे पाहण्याचा तुमच्या सासूचा दृष्टिकोनच वेगळा असतो. म्हणजे मला असं वाटतं की आपण स्वतःला झिरो किंमत द्यावी आणि आपण त्यांचं रिलेशन बघावं. म्हणजे आजी आणि त्या नातवाचं नातं पाहून आपण गप्प बसावं’.