काल १८ मार्च रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नवीन मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला. पहिल्या प्रोमो पासूनच मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली होती. त्यानुसार मालिकेचा पहिला एपिसोड आवडल्याची प्रतिक्रिया आता प्रेक्षकांनी देण्यास सुरुवात केली आहे. जानकी, हृषीकेश, रेवा, शर्वरी, सारंग, नानी आजी म्हणजेच सुमित्रा, नाना आजोबा अशी पात्र मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये पहायला मिळाली. रणदिवे कुटुंबातील हृषीकेश हा सावत्र मुलगा असतो पण तो पत्नी जानकी सोबत कुटुंबाला एकत्र जोडून ठेवताना दिसतो. या मालिकेत नाना आजोबांचे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेते प्रमोद पवार यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार हे गेली अनेक दशकं मराठी सृष्टीत कार्यरत आहेत.
खरं तर अभिनयाचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाले होते कारण कोकणात राहत असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्याकाळी नाटकातून काम केले होते. तर त्यांच्या आईदेखील उत्तम गायिका होत्या. रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना प्रमोद प्रवार हे नाटकाशी जोडले गेले. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतून प्रमोद पवार यांचा अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रातील प्रवास सुरु झाला होता. मर्मबंध, जाता नाही जात, आर्य चाणक्य, रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत माऊली, अनन्या, इथे ओशाळला मृत्यू अशा अनेक नाटकातून मालिकेतून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून काम करत असताना प्रमोद पवार यांना एका प्रोजेक्टमध्ये मोठे नुकसान सोसावे लागले होते. हातातील सगळे पैसे त्यांनी गमावले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीचा मोठा आधार त्यांना मिळाला होता. वैभवी पवार या प्रमोद पवार यांच्या पत्नी, दक्षिण मध्य रेल्वे मध्ये त्या नोकरी करतात.
कठीण काळात त्यांनी घर सावरायला खूप मदत केली होती. ट्रकभर स्वप्न या चित्रपटाचे दिग्दर्शन करता यावे म्हणून प्रमोद पवार यांनी नोकरीला कायमचा रामराम ठोकला. त्यांची मुलगी पूर्वा पवार ही देखील अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाचे बाळकडू तिला वडिलांकडूनच मिळाले होते. दुर्गा झाली गौरी या संगीत नाटकातून तिने काम केले होते. नालंदा इन्स्टिट्यूट मधून पूर्वाने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत. जाहिरात, नाटक, चित्रपट असा अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास सुरु आहे. मग्न तळ्याकाठी, युगांत, ढोलकीच्या तालावर अशा नाटक, रिऍलिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती. ३६ गुण या चित्रपटात ती संतोष जुवेकर सोबत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली होती.