serials

कलर्स मराठीची हि मालिका लवकरच संपणार… स्पृहा जोशीची नवी मालिका घेतेय जोरदार एन्ट्री

वाहिनीला टीआरपी मिळवण्यासाठी झी मराठी आणि कलर्स मराठी वाहिनीमध्ये आता चुरशीची लढत रंगलेली पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून स्टार प्रवाह वाहिनीने टॉप १० च्या यादीत कब्जा मिळवला आहे. त्यामुळे झी मराठी आणि कलर्स मराठी घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीने नवनवीन धाटणीच्या मालिकांची रांगच लावली त्यात हिंदी सृष्टी गाजवणाऱ्या तगड्या कलाकारांनाही अभिनयाची संधी दिली. तर याच जोडीला केदार शिंदे कलर्स मराठी वाहिनीचे हेड झाल्यापासून त्यांनीही वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.

spruha joshi new serial sukha kalale
spruha joshi new serial sukha kalale

केदार शिंदे यांनी ‘इंद्रायणी’ या नावाची एक गोड मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे येत्या २५ मार्चपासून संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रसारित होत आहे. याचबरोबर आता त्यांनी आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘सुख कळले ‘ या नवीन मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सागर देशमुख या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. झी मराठीच्या लोकमान्य या मालिकेनंतर स्पृहा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लवकरच कलर्स मराठी वाहिनी त्यांच्या दोन मालिकेला डच्चू देऊ शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान इंद्रायणी ही मालिका सिंधुताई माझी माई या मालिकेच्या वेळेत प्रसारित होणार आहे. पण मालिकेला अजून बरेच कथानक असल्याने तूर्तास तरी सिंधुताई मालिकेच्या वेळेत बदल होईल असे मत व्यक्त करण्यात येत आहे. तर भाग्य दिले तू मला या मालिकेचे कथानक आता आमटीत पाणी वाढवण्यासारखे झाले आहे त्यामुळे भाग्य दिले तू मला मालिकेचा शेवट गोड करून ती एक्झिट घेईल असे म्हटले जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला रमा राघव मालिकेत लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे त्यामुळे रमा राघव ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. पण असे असले तरी नव्या मालिकेत स्पृहा जोशी झळकणार हे जाणूनच प्रेक्षकांनी या मालिकेचे स्वागत केले आहे. नवरा बायको अशा सुखी जोडप्याची कहाणी सुख कळले मालिकेतून पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कट कारस्थानं आणि भांडण तंटा या विषयाला फाटा देऊन नवीन काहीतरी बघायला मिळेल या हेतूने प्रेक्षकांनी केदार शिंदेचे कौतुक केले आहे. वाहिनीचा टीआरपी वाढवण्यास केदार शिंदे कितपत यशस्वी ठरतात हे आता येत्या काही दिवसातच कळेल. तूर्तास स्पृहा जोशी आणि सागर देशमुख दोघांनाही नव्या मालिके निमित्त खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button