कलाकार मंडळी कुठलीही गोष्ट शेअर करताना एकतर आपण कौतुकाचे धणी होणार नाहीतर ट्रोल होणार या विचारानेच पुढे जात असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मिताली मयेकर हिच्या बिकीनी फोटोंवर ट्रोलिंगचा पाऊस पडला. तेव्हा मितालीने ट्रोल करणाऱ्यांना तिखट शब्दांत उत्तर दिले. तर काही दिवसांपासून अभिनेते अविनाश नारकर देखील ट्रोलिंगचा सामना करत आहेत. अविनाश नारकर त्यांच्या इन्स्टग्राम अकाउंटवर डान्सचे रिल्स शेअर करत असतात. त्यांचा हा डान्स पाहून अनेकजण त्यांच्या या उत्साहाचं कौतुक करतात तर काहीजण त्यांना वयाचे भान ठेवायला सांगतात. खरं तर अविनाश नारकर यांच्या फिटनेसकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत
पत्नी ऐश्वर्या नारकर सोबत ते अनेकदा असे व्हिडीओ शेअर करत असतात. त्याचसोबत हे दोघेही रिल्स बनवून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आमच्या पप्पाने गंपती आणला या गण्यावरचे त्यांचे रील तुफान व्हायरल झाले होते त्यावरही ट्रोलर्सने त्यांची विरोधी प्रतिक्रिया दिली होती. नुकतेच दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या एका रीलवर ट्रोलर्सने कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका ट्रोलरने त्या रीलवर ‘नमस्कार आजोबा’ अशी कमेंट केलेली आहे. सततच्या या ट्रोलिंगला कंटाळून आता ऐश्वर्या नारकर यांनी या ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला आहे. आजोबा म्हणणाऱ्या युजरला त्यांनी ‘काय म्हणता पणजोबा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युजरने त्यांना ‘म्हातारचळ लागलेले आजी आजोबा’. असे म्हटले आहे.
त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी चोख उत्तर देताना म्हटले आहे की, ” बुद्धी गंजेल असे विचार करून… तुमच्या घराण्यात म्हातारचळ लागायचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तर सगळंच राहून जाईल दुसऱ्यांना बोलण्यात. म्हातारचळचा अर्थही बघून घ्या जरा, बुद्धी भ्रष्ट. ” ऐश्वर्या नारकर यांच्या या उत्तरावर अनेकांनी समर्थन दिले आहे. खरं तर जीवनाचा आनंद कधीही कोणत्याही वयात घेतला पाहिजे. या गोष्टीला वयाची मर्यादा न लादलेलीच बरी. आयुष्यात हे करायचं राहून गेलं अशी गत व्हायला नको म्हणून आहे ते जीवन जगून घ्या असेच मत ऐश्वर्या नारकर यांनी व्यक्त केले आहे. ऐश्वर्या नारकर यांचे हे मत अनेकांना पटले आहे. त्यांच्या या रीलवर काही सकारात्मक प्रतिक्रिया देखील त्यांना मिळाल्या आहेत. दोघांची जोडी सुरेख आहे आणि आयुष्यातला आनंद असाच लुटला पाहिजे असेही अनेकांचे म्हणणे आहे.