
प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरातून तब्बल ६ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात संबंधित नोकराला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नेहा पेंडसेचा पती शार्दुल सिंग बयास (वय वर्षे ४७) याच्याकडे कामाला असलेला ड्रायव्हर रत्नेश झा (वय वर्षे ४७) यांनी पोलीस चौकीत जाऊन संशयित नोकरा विरोधात तक्रार दाखल केली आहे. वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या २३ व्या मजल्यावरील शार्दूलच्या फ्लॅटमध्ये सहा लाख किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली असल्याचे ड्रायव्हरने या तक्रारीत म्हटले आहे. चोरीच्या या घटनेनंतर शार्दुलने त्याच्या ड्रायव्हरला एफआयआर नोंदवण्यास सांगितले होती. तक्रारीत झा यांनी नमूद केले आहे की, २८ डिसेंबर रोजी बयास यांनी त्यांचे सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याने जडवलेली अंगठी हरवल्याचे सांगितले.

हे ब्रेसलेट आणि अंगठी त्यांना चार वर्षांपूर्वी झालेल्या लग्नात भेट म्हणून मिळाली होती. शार्दुल हे दागिने सहसा बाहेर घालायचा एक दिवस घरी परतल्यावर त्याने ते दागिने घरातील नोकर सुमित कुमार सोळंकी यांच्याकडे सोपवले होते आणि बेडरूमच्या कपाटात ठेवण्यास सांगितले होते. सुमित कुमार सोळंकी हे शार्दूलच्या घरी इतर नोकरांसोबत राहत असत. घटनेच्या दिवशी शार्दुल बाहेर जाण्याच्या तयारीत होता तेव्हा त्याने कपाट उघडून दागिन्यांची शोधाशोध केली, पण त्याला ते दागिने सापडले नाही. घरातील सर्व नोकरांकडे चौकशी केली असता त्या हरवलेल्या दागिन्यांबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. त्यावेळी सोळंकी घरी नव्हते म्हणून शार्दूलने त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला, तेव्हा तो कुलाबा येथे मावशीच्या घरी असल्याचे कळले. ताबडतोब घरी बोलावून देखील सोळंकीला यायला उशीर होत असल्याचे पाहून शार्दूलला त्याच्यावर संशय आला.

त्याच मुळे ड्रायव्हरला पोलिस चौकीत पाठवून घडलेल्या घटनेबद्दल सोळंकी विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब सोळंकीला अटक केली. पण त्यानंतरही ते सहा लाख किमतीचे दागिने त्याच्याजवळ मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता सोळंकीने आहे त्याच ठिकाणी दागिने ठेवले असल्याचे म्हटले. मात्र, शार्दुलने शोधाशोध करूनही त्याला कुठेच ते दागिने सापडले नाहीत. यासंदर्भात पोलिसांनी इतर नोकरांजवळ सखोल चौकशी सुरू केली आहे आणि लवकरच खरा आरोपी ताब्यात येईल असा विश्वास त्यांनी शार्दुल आणि नेहाला दिला आहे.