![rishi manohar Vyahi bhojan in dhepe wada](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/01/76543245436546.jpg)
मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. नुकतेच प्रथमेश परबने पहिले वहिले केळवण साजरे करत गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबत व्हॅलेंटाईन डे ला लग्न करणार असल्याचे जाहीर केले. तर अभिनेत्री पूजा सावंत हिच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. अशातच आता मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकताना दिसणार आहे. ‘टेन डेज टू गो’ असे म्हणत अभिनेता ऋषी मनोहर याने डिसेंबर महिन्यात व्याही भोजन साजरे केले होते. पुण्यातील प्रसिद्ध ढेपे वाडा येथे हा सोहळा पार पडला होता. ऋषी मनोहर हा प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा गानू मनोहर यांचा मुलगा आहे. पौर्णिमा यांनी उंबरठा चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले होते.
स्मिता पाटील यांच्या मुलीच्या भूमिकेत त्या झळकल्या होत्या. राजवाडे अँड सन्स, सुराज्य, तुझं माझं जमेना, चिंटू, पेट पुराण, तुंबाडाचे खोत , पांडू, एका काळेचे मणी, वाडा चिरेबंदी अशा नाटक, चित्रपट तसेच मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. पौर्णिमा मनोहर आणि अपर्णा केतकर या दोघी सख्ख्या बहिणी. दोघी बहिणींनी बालवयातच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे पौर्णिमा यांनी अभिनय क्षेत्रात तर अपर्णा यांनी निर्मिती क्षेत्रात करिअर घडवले. तर पौर्णिमा मनोहर यांचा मुलगा ऋषी मनोहर हा देखील अभिनेता असून त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. त्याने अभिनित केलेला कन्नी हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून सध्या तो अफरा तफरी नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
![actor Rishi Manohar wedding engagement photos](https://bolkyaresha.in/wp-content/uploads/2024/01/324564642342453654.jpg)
३ मे २०२३ रोजी तन्मई पेंडसे सोबत ऋषीचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता जवळपास सात महिन्यांच्या कालावधीनंतर तो विवाहबद्ध होत आहे. तन्मई ही डेंटिस्ट आहे. आज ग्रहमख पुजनाने ऋषी आणि तन्मईच्या लग्नाअगोरच्या विधींना सुरुवात झाली आहे. मेहेंदी सोहळा, हळदीचा सोहळा आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या लग्नाचा थाट नेमका कसा असणार याची अधिक उत्सुकता आहे.