आशा भोसले यांच्या नातीची अभिनय क्षेत्रात एन्ट्री दिसते खूपच सुंदर …छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी राणी सईबाई यांच्या भूमिकेत
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आजवर त्यांच्या जादुई आवाजाने करोडो चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची नात जनाई भोसले ही देखील गायन क्षेत्रात नाव लौकिक करत आहे मात्र आता जनाई प्रथमच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री करताना दिसणार आहे. आशा भोसले यांची नात जनाई ही लहान असल्यापासूनच गायनाचे धडे गिरवत होती. आतापर्यंत अनेक कॉन्सर्टमध्ये तिने आजी आशा भोसले सोबत गाणी सादर केली आहेत. तिने काही मराठी अल्बम आणि चित्रपटांसाठी गाणी गायली, पण आता जनाई अभिनय क्षेत्रात दाखल होत असल्याने तिच्यासह सर्वानाच आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता असणाऱ्या संदीप सिंग यांनी त्यांच्या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.
जनाई या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी राणी सईबाई यांची भूमिका साकारत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक स्वतः संदीप सिंग साकारणार आहे. संदीप सिंग यांनी राणी साईबाईच्या भूमिकेत जनाई झळकणार हे जाहीर करताच जनाईला मंचावरच रडू कोसळले. या ऐतिहासिक भूमिकेसाठी आपली निवड करण्यात आली हे जाणूनच तिला गहिवरून आले होते. भारावलेल्या जनाईने ‘आता मी या ठिकाणी काहीच बोलू शकत नाही , ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे’… असे म्हणत उपस्थितांचे आभार मानले. त्याच मंचावर आशा भोसले देखील उपस्थित होत्या त्यांनाही नातीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण होतंय हे पाहून खूप भरून आलं होतं. ‘माझी नात सुंदर आहेच पण तिला शिवाजी महाराजांची पत्नी बनण्याची एवढी मोठी संधी मिळेल याचा मी कधीच विचार केला नव्हता.’
दरम्यान संदीप सिंग यांनी चित्रपटाचे नाव जाहीर केल्यानंतर आता लवकरच शूटिंगला देखिल सुरुवात होईल असे जाहीर केले आहे. जनाई भोसले आणि संदीप सिंग हे दोघेही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या इतर स्टार कास्ट बद्दलही लवकरच खुलासा करण्यात येईल. संदीप सिंग यांनी आजवर अनेक दर्जेदार मालिका तसेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. खूप कमी वयातच त्याने या क्षेत्रात जम बसवलेला पाहायला मिळत आहे. रणदीप हुड्डाची प्रमुख भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा त्याची निर्मिती असलेला बहुचर्चित चित्रपट येत्या २२ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. संदीप सिंगनेच आशा भोसले यांची नात जनाई हिला अभिनयाची संधी मिळवून दिली आहे त्यामुळे तिच्या या पहिल्या वहिल्या चित्रपटाची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.