मराठी कलाविश्वात कलाकारांची मुलं सुद्धा नशिब आजमावण्यासाठी अभिनय क्षेत्राची वाट धरत असतात. त्यात काहींना यश मिळते तर काहींना अपयश पचवावे लागते. मात्र आई वडिलांची ओळख लपवून काही अभिनेत्री स्वतःला अभिनय क्षेत्रात सिद्ध करून दाखवतात त्यातलीच एक म्हणजे किशोरी अंबिये यांची मुलगी. किशोरी अंबिये या गेली अनेक दशकं मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. झपाटलेला चित्रपटात त्यांनी महेश कोठारे यांची नायिका साकारली होती. त्यानंतर आताच्या घडीला त्या अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहेत. कधी खोडकर , कधी विरोधी, तर कधी नायिकेची आई अशा भूमिकेतून त्या मालिका विश्वात पाय घट्ट रोवून उभ्या आहेत. पण एवढे दिवस या सृष्टीत काम केल्यानंतर किशोरी अंबिये यांचं खाजगी आयुष्य चाहत्यांपासून लपवून राहिलं होतं.
पण काल प्रथमच त्यांनी मराठी सृष्टीत कार्यरत असलेल्या लेकीची ओळख करून दिली. अभिनेत्री काजल पाटील हिने किशोरी अंबिये यांच्या सोबतचा एक खास फोटो शेअर केला. हॅश टॅग लाईक मदर लाईक डॉटर म्हणत काजलने ‘आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या पाठिंब्यामुळेच’ किशोरी आंबिये यांचे आभार मानले आहेत. त्यावर अनेकांनी त्यांना तुम्ही खऱ्या आयुष्यात मायलेकी आहात का? असा प्रश्न विचारला तेव्हा किशोरी अंबिये यांनी स्वतःच या गोष्टीचा खुलासा करताना हो, ती माझी मुलगी आहे असे म्हटले आहे. खरं तर किशोरी अंबिये आणि काजल पाटील या दोघींनी कुलस्वामिनी या मालिकेतून एकत्रित काम केले होते. माय लेकीच्या भूमिकेत या दोघी झळकल्या होत्या, त्यामुळे दोघींमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेले होते. तेव्हापासून आई आणि लेक असेच नाते ते आजही जपताना पाहायला मिळत आहेत.
काजल पाटील ही कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करत असे. अथर्व पाटील हा तिला एक भाऊ आहे सध्या तो शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. कुलस्वामिनी मालिकेत काजलच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला होता. तुझ्यात जीव रंगला, काय घडलं त्या रात्री, शुभ विवाह अशा मालिकेतून काजलने आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या प्रवासात किशोरी अंबिये यांची तिला नेहमीच साथ मिळत असते. म्हणूनच तिने दोघींचा एक खास फोटो शेअर करून ही पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे ऑन स्क्रीन मायलेकी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.