Breaking News
Home / जरा हटके / सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील सज्जनरावांची भूमिका साकारली आहे या कलाकाराने

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील सज्जनरावांची भूमिका साकारली आहे या कलाकाराने

कलर्स मराठी वरील “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेतील सज्जनराव प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेले पाहायला मिळतात. बहुतेक मालिकांमधून प्रमुख नायका नायिकेईतकीच सहाय्यक कलाकाराची भूमिका विशेष लक्षवेधी ठरलेल्या पाहायला मिळतात. मग त्याला थोडा विनोदी बाज असेल तर ती भुमिका प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात. “देवमाणूस” मालिकेतील टोण्या, सरूआज्जी, “माझा होशील ना” मालिकेतील पिंट्यामामा, नैना तर “अग्गबाई सासूबाई” मालिकेतील मॅडी अशाच काही विनोदी वलय असलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. याच धाटणीची सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील सज्जनरावांची भूमिका देखील लोकप्रिय झालेली पाहायला मिळते. ही भूमिका साकारणाऱ्या या हरहुन्नरी कालाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

sandesh upsham actor
sandesh upsham actor

सज्जनराव हे पात्र गाजवणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “संदेश उपशाम”. संदेश उपशाम यांनी अनेक मराठी- हिंदी नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून काम केले आहे. मालिकेत सज्जनरावांची भूमिका केवळ ५ दिवसांचीच असणार असे संदेश उपशाम यांना सांगण्यात आले होते पण त्यांच्या या भूमिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले त्यामुळे सज्जनराव हे पात्र पुन्हा एकदा मालिकेतून सक्रिय झालेले पाहायला मिळाले. मधल्या काळात संदेश उपशाम यांनी साकारलेला सज्जनराव अचानक मालिकेत दिसेनासा झाला त्यामुळे तो परत येईल का?.. तो कुठे गेला आहे?… असे प्रश्न प्रेक्षकांनी सोशल मीडियावर विचारले होते हेच त्यांच्या अभिनयाचे खरे यश म्हणावे लागेल. आता तर लतिकाचा बॉस म्हणून सज्जनराव मालिकेत पाहायला मिळत आहेत सज्जनराव या पात्राच्या वागण्यात आणि बोलण्यात एक साधेपणा आणि भोळेपणा जाणवतो, आपलं प्रेम मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरत आहे. अभिनयासोबतच संदेश उपशाम हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत आहेत. अभिनय आणि नोकरी अशी त्यांची तारेवरची कसरत सध्या सुरू आहे. “पळा पळा कोण पुढे पळे तो..”, “गेला उडत”, “करून गेलो गाव”, “स्पिरिट”,” नकळत दिसले सारे”, “ढॅण्टॅढॅण” अशा दमदार नाटकांतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. बंध नायलॉनचे, पोश्टर बॉईज, इत्तेफाक, क्या हाल मि. पांचाल अशा मालिका आणि चित्रपटातूनही त्यांनी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तूर्तास संदेश उपशाम यांना सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील सज्जनरावांच्या भूमिकेसाठी खुप खुप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *