
झी मराठीवर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे बदल घडून येत आहेत. अशातच काही नवीन रिऍलिटी शोना संधी देण्यात आली आहे तर काही मालिकांना आटोपते घेण्यात आले आहे. हा सगळा खटटोप घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी नक्कीच आहे असे म्हणायला हरकत नाही. झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका आणि रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात झी मराठी वाहिनीच्या मालिकांना टॉप दहाच्या यादीतही नाव नोंदवता आलेले नाही. सध्या झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही एकमेव मालिका टॉप १५ च्या यादीत प्रवेश करताना दिसली आहे. त्यामुळे आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी झी मराठी वाहिनी नवनवीन शो आणि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. याचाच परिणाम म्हणून की काय गेल्या दोन वर्षात झी मराठी वाहिनीच्या मालिका अल्पावधीच्या कालखंडात बंद करण्यात आल्या आहेत.

लवकरच या वाहिनीवर ‘ड्रामा Juniors’ हा रिऍलिटी शो दाखल होत आहे. या शोमध्ये लहान मुलांना त्यांचे टॅलेंट दाखवता येणार आहे. ऑडिशन द्वारे काही चिमुरड्या स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून हा शो आठवड्यातून तीन वेळा प्रसारित केला जाईल असे म्हटले जात आहे. त्याच्याच दुसऱ्या बाजूला नवा गडी नवं राज्य ही मालिकाही प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. काल या मालिकेच्या शेवटचा सिन शूट करण्यात आला. श्रुती मराठे हिची निर्मिती असलेली नवा गडी नवं राज्य ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळवत होती. आनंदी आणि राघव या दोघांच्या लग्नाची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळाली होती. मात्र रमाचे आनंदीच्या संसारात जरा जास्तच लुडबुड करणे प्रेक्षकांना थोडेसे खटकले. तेव्हापासून मालिकेचा टीआरपी खाली घसरलेला पाहायला मिळाला. पल्लवी पाटील, कश्यप परुळेकर ही फ्रेश जोडी या मालिकेतून दाखवण्यात आल्याने प्रेक्षकांनी या मालिकेचे स्वागतच केले होते. मधल्या काळात चिंगीची भूमिका साकारणारी साईशा भोईर हिनेही मालिकेतून काढता पाय घेतला.

त्यामुळेही मालिकेचा टीआरपी सतत कमी होत गेला. याचाच परिणाम म्हणून की काय या मालिकेची वेळ बदलण्यात आली. यादरम्यान झी मराठी वाहिनीने ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या शोला प्रेक्षकांकडून आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या शोमुळे नवा गडी नवं राज्य मालिकेला त्याची प्रसारणाची वेळ बदलून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून दुपारी २ वाजता ही मालिका प्रसारित केली जात आहे. मात्र टीआरपी नसल्याने नवा गडी नवं राज्य या मालिकेने आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या आठवड्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. त्यामुळे या एका वर्षात कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आले होते. काल मालिकेला निरोप देताना हे कलाकार खूप भावुक झालेले पाहायला मिळाले. तूर्तास एका ठराविक कालावधीनंतर मालिकेने थांबणे गरजेचे होते असे म्हणत प्रेक्षकांनीही या निर्णयाचे स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे.