झी मराठीच्या तब्बल ४ मालिका गाशा गुंडाळणार… गेल्या काही वर्षांपासून टीआरपी घसरल्याने आर्थिक अडचणींना
झी मराठी वाहिनी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. काही दिवसांपूर्वीच तू चाल पुढं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर नवा गडी नवं राज्य आणि ३६ गुणी जोडी या मालिकांनाही अल्पावधीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. पण या मालिकांच्या जागी आता झी मराठी वाहिनी तब्बल ४ नव्या मालिका घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वाहिनीने ‘शिवा’ आणि ‘पारू’ या दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. या दोन्ही मालिकेचे नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यावरून मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी प्रतिक्रिया वाहिनीला मिळत आहे. याच जोडीला आता झी मराठीने आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा केलेली आहे.
‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ अशी या दोन नवीन मालिकेची शीर्षकं आहेत. पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका हिंदी मालिका ‘पुनर्विवाह’ या मालिकेचा रिमेक असणार आहे. तर नवरी मिळे हिटलरला ही मालिका ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक असणार आहे. या मालिकेच्या एंट्रीमुळे झी मराठी वाहिनीच्या तब्बल ४ मालिकांना डच्चू देण्यात येणार आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील जाऊ बाई गावात हा शो प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवताना दिसत आहे. पण काही महिन्याच्या कालावधीतच या शोची सांगता होणार आहे. त्यामुळे या दोन नवीन मालिकांना याठिकाणी संधी देण्यात येत आहे. अशातच ‘ड्राम जुनीअर्स ‘ हा आणखी एक रिऍलिटी शो प्रसारणाच्या वाटेवर आहे. त्यामुळे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेला येत्या काही दिवसात आपला गाशा गुंडाळावा लागणार असे बोलले जात आहे. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेलाही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे.
दरम्यान झी मराठी वाहिनीला गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात वाहिनीचा टीआरपी देखील खाली घसरला आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनी सोनी वाहिनीसोबत विलीनीकरणाला तयार झाली असल्याचे सांगितले जात होते. झी आणि सोनी वाहिनी एकत्र आले असते तर सुमारे १० अब्ज डॉलर मूल्यांकन असलेली एक मोठी कंपनी तयार झाली असती. करारानुसार २१ डिसेंबर २०२३ रोजी झी वाहिनी सोनी वाहिनीत विलीन होणार होती, पण सोनी वाहिनीने विलिनीकरणाच्या अटींची पूर्तता केली नसल्याने आणि दोन्ही वाहिन्यांच्या विचारात मतभेद असल्याने तूर्तास हा करारनामा रद्द करण्यात आला आहे.