पालघरमध्ये मी १७ एकर जमीन खरेदी केली शेती करण्यासाठी गेलो आणि पहिल्याच वर्षी सगळं गमावलं कर्ज बाजरी झालो मग
अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे आहे. काहींना या क्षेत्रात यश मिळते तर काहींना परतीचा मार्ग निवडावा लागतो. लॉकडाऊनच्या काळात तर अनेक कलाकारांनी गावच्या शेतीकडे आपला मार्ग वळलेला पाहायला मिळाला. हिंदी सृष्टीतील बरेचसे प्रसिद्ध चेहरे शेतीकडे वळले. त्यातलाच एक म्हणजे अभिनेता राजेश कुमार. मूळचा बिहारचा असलेला राजेश कुमार सध्या सेंद्रिय शेती करताना दिसत आहे. पालघरमध्ये त्याची तब्बल १७ एकर जमीन आहे. या शेतीत तो स्वतः राबताना दिसत आहे. एक अभिनेता म्हणून चंदेरी दुनियेत समाधान न मिळालेल्या राजेशला शेतीची ओढ लागली. मुंबईहून तो पालघरला आला. सुरुवातीला शेती करत असताना राजेशला खूप नुकसान सहन करावे लागले. या शेतीत त्याने काही हजार झाडं लावली होती. पण त्यानंतर पुराच्या पाण्यात ती सगळी झाडं वाहून गेली.
दोन तीन वर्षे त्याने उत्पन्न घेण्यास सुरुवात केली पण काही कारणास्तव दुर्लक्ष झाल्याने शेती जळून गेली. आर्थिक नुकसानामुळे राजेश कर्ज बाजारी झाला. जवळ होते नव्हते तेवढे सगळे पैसे त्याने शेतीत गुंतवले होते. शेतकरी आत्महत्या का करतात याचे उदाहरण त्याने याची देही याची डोळा अनुभवले होते. त्यात भर म्हणून की काय लॉक डाऊन सुरू झाले. अशातच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजेशने पुन्हा एक प्रयत्न केला. शेजारीच आलेली ५ एकर जमीन त्याने भाड्याने घेतली. काही मित्रांच्या मदतीने त्याने भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. पण महत्वाचा प्रश्न होता त्यासाठी मार्केटिंग शोधणं. या सगळ्यांचा त्याने सखोल अभ्यास केला. मग सेंद्रिय भाजीपाला पिकवायचा हे त्याने ठरवले. लॉक डाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात असताना त्याने आपली शेती पर्यटकांसाठी खुली केली. यावेळी अनेक पर्यटक त्याची सेंद्रिय शेती पाहायला दूरदूरवरून येऊ लागले. त्यांची मुलं शेतीत रमायला लागली. झाडं कशी लावायची, ती कशी वाढवायची या अभ्यासक्रमात मुलांचा दिवस कसा जात होता याचेही भान त्यांना नव्हते.
या कामामुळे आपली मुलं मोबाईलपासून दूर राहू लागली आहेत हे त्याने त्यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा लोकांनाही त्याचे म्हणणे पटले. त्यामुळे राजेशच्या या शेती व्यवसायाला झपाट्याने यश मिळत गेले. एक अभिनेता म्हणून चंदेरी दुनियेत रमण्यापेक्षा राजेशला इथले वातावरण आकर्षित करून गेले. १९९९ साली राजेशने बॉलिवूड सृष्टीत पदार्पण केले होते. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतील त्याची भूमिका खूपच गाजली होती. पण २०१७ नंतर जसजसे या इंडस्ट्रीत काम कमी झाले तसतसे राजेशने शेतीकडे आपली पाऊलं वळवली. त्याने अजून अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडून दिले नसले तरी छोट्या छोट्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. दरम्यान आता पालघरचा यशस्वी शेतकरी अशी तो ओळख मिरवत आहे.