म्हणून भीतीपोटी मी ती पोस्ट डिलीट केली…धमक्या येऊ लागल्याने यशोदा मालिकेच्या दिग्दर्शकाचा खुलासा
काही दिवसांपूर्वी टीआरपी मिळत नसल्याने झी मराठी वरची यशोदा गोष्ट श्यामच्या आईची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसली. वीरेंद्र प्रधान यांनी यशोदासह, उंच माझा झोका, स्वामिनी यासारख्या अनेक मालिकाचे दिग्दर्शन केले. यशोदानंतर ते आता लवकरच एक नवीन कलाकृती घेऊन येणार आहेत. त्यासाठी त्यांनी कलाकार हवेत अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. पण हि पोस्ट वीरेंद्र प्रधान यांना डिलीट करावी लागली. यामागचे कारण सांगताना वीरेंद्र प्रधान यांनी एक खुलासा केला आहे. “नवीन मालिकेसाठी कलाकार हवेत.. एका छान कलाकृती ची निर्मिती करताना , काही निकष , जे आम्ही या क्षेत्रात २५,३० वर्षे काम केल्या नंतर, साधारण १ टक्का समज आल्यावर ( हा एक टक्का माझ्या बद्दल आहे ) समोर ठेवतो आणि कथा , पटकथा , संवाद , संगीत , काव्य , दिग्दर्शन , फोटोग्राफी , कला वगैरे वगैरे ची मांडणी करतो . एक कथा तयार झाल्याव आणि ती वाहिनी ला आवडल्यावर, त्या वर पटकथा तयार होते. पटकथा हाच टीव्ही चा आत्मा आहे असे माझे मत आहे. आता ही पटकथा तयार झाली की व्यक्तिरेखे नुसार कलाकार निवड होते . व्यक्तिरेखा म्हणजे काय ? एखाद्या पात्रा चा स्वभाव , रंगरूप , उंची , जाडी , चेहेरा , शारीरीक ठेवण , कपडे वगैरे वगैरे . थोडक्यात त्या व्यक्तिरेखे चे एक स्केच तयार केले जाते आणि मग त्या स्केच ला मिळता जुळता चेहेरा, कलाकार म्हणून निवडला जातो.
आता हे जे कलाकार आहेत , त्याचे ही काही निकष , शास्त्र , अभ्यास असतो . अनुभव हा काम करुनच मिळतो परंतु बेसिक शास्त्र आणि प्रशिक्षण जसं इतर कुठल्याही क्षेत्रा साठी असतं , तसंच ते इकडे ही असतं . डॉक्टर , इंजिनिअर किंवा कुठे ही जसे निकष असतात , तसे ते कलाक्षत्रात ही असतात . पाळणे , न पाळणे हा पुन्हा वैयक्तिक चॉइस आहे . मी पाळतो . ९० टक्के तसा प्रयत्न नक्की करतो. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचंय , त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास केला की मग असे प्रश्न पडत नाहीत , की माझी निवड का नाही झाली. हे लिहिण्या मागे कारण काय ? तर , २ दिवसांपूर्वी मी एक पोस्ट शेयर केली . कलाकार हवेत . आज मी ती भीतीने डिलीट केली . भीती कसली ते ही सांगतो . एका आम्ही तयार केलेल्या व्यक्तिरेखे साठी , समजा ती एका निष्णात डॉक्टर या व्यक्तिरेखे साठी असेल , तर त्या साठी , किमान १००० लोक संपर्क साधतात . त्या एका माणसासाठी तो एकच असतो , पण आमच्याकडे साधारण १००० येतात . ( हा आकडा कधी कधी १०, २५ हजारा पर्यंत ही जातो ) . म्हणजे व्यक्तिरेखा एक आणि उमेदवार १००० आता आलेल्या सगळ्या चांगल्या लोकांकडून त्यांची , ठरलेल्या निकषा प्रमाणे , निवड करणे हे मोठे अवघड काम सुरु होते . त्यातून , हजारातून एक निवडण्यासाठी मोठी यंत्रणा असते का आमच्याकडे , तर तसे ही मुळीच नाही . का नाही तर त्या साठी वेगळा लेख मी तयार करेन. कलाकार हवेत असे जेव्हा आम्ही लिहितो , तेव्हा त्या निवेदनात आम्ही हा उल्लेख केलेला असतो , की कृपया फोन करू नका . का नका करू ? तर एक माणूस , एका तासात हजार फोन उचलू लागला , तर जे तुमचे होईल , तेच त्याचे होईल . पण लोक ऐकत नाहीत . आमचीच निवड करा , किंवा आमची निवड का नाही केली , किंवा तुमचे कलाकार आधीच ठरलेले असतात मग नाटके कशा साठी करता , ते विविध धमक्या देण्या पर्यंत कॉल्स करत रहातात.
आता असे पहा , चांगल्या कलावंताना संधी मिळावी म्हणून आपण एखादी पोस्ट शेयर करतो पण ते रहाते बाजूला , आणि भलतेच होऊन बसते. म्हणून भीतीपोटी मी ती पोस्ट डिलीट केली. लोकप्रियता मिळते म्हणून आपण ही अभिनय करावा , कारण हे तर एकदम सोपे आहे , असे सांगणारे खूप लोक भेटतात . आणि त्या आकर्षणापोटी , खुप चुकीची पावले उचलून , नंतर फ्रस्ट्रेट होतात . निराश होतात . तेव्हा वाईट वाटते . डॉक्टरकीचे प्रशिक्षण न घेताच , मी ऑपरेशन केले त्या पेशंट चे , पोट तर सहज उसवले , पण आता शिवता येत नाहीये , मग मी निराश झालो . असेच काहीसे मला कायम वाटते . मी पुन्हा सांगतो की माझा अनुभव ३० वर्षांचा असला तरी माझी या क्षेत्राची समज १ टक्काच आहे . कलाप्रांत हा विशाल समुद्र आहे . माझ्या मताशी काही सहमत नसतील , त्यांचा अनुभव आणि समज माझ्या पेक्षा कैक पटीने मोठी असू शकते . मी त्यांचा आदर करतो . मला आलेल्या अनुभवा बद्दल मी हे लिहिले आहे. कलाकार होणे एवढे सोपे नाही . आणि त्यातून , आपली निवड का नाही झाली , याचा सारासार विचार न करता , समोरच्याला दोष देणे , आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर न करणे या सारखे दुःख नाही . आपल्या सारखे कैक , अप्रतिम कलावंत याच भूमीतून तयार झालेत . ते उत्तम सर्जन आहेत म्हणून . उत्तम सर्जन व्हावे आणि जसे एखाद्याचे पोट उसवले , तसेच त्याला उत्तम आरोग्य देऊन , पुन्हा छान शिवून द्यावे , ही पूर्तता हवी . या पूर्ततेच्या निकषावर , आपण आपले कलावंत म्हणून आरोग्य सांभाळूया. चूक भूल द्यावी घ्यावी ! “