वारकरी सांप्रदयातील वरिष्ठांनाही आमंत्रण नाही…अयोध्येतील सोहळ्याबाबत कीर्तनकार शिवलीला पाटील काय म्हणाल्या
२२ जानेवारी २०२३ रोजी अयोध्या येथील मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी भारतातील अनेक नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. क्रीडा, राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. पण नुकतेच कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार शिवलीला पाटील यांनी आम्हाला हे आमंत्रण मिळाले नसल्याचे मीडियाला म्हटले आहे. शिवलीला पाटील या वयाच्या ५ व्या वर्षांपासूनच कीर्तन करतात. महाराष्ट्रातील गावागावात त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. नुकत्याच एक मुलाखतीत शिवलीला पाटील यांनी आम्हाला अयोध्येसाठी आमंत्रण नसल्याचे म्हटले आहे.
कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार शिवलीला पाटील म्हणतात की, “अजून तरी वारकरी सांप्रदायातील वरिष्ठांना आमंत्रण मिळालेले नाही. ते मिळेल की नाही हे माहीत नाही. पण नाही जरी मिळाले तरी काही हरकत नाही. खरं तर जगाच्या मालकासाठी हे एवढं मोठं सुंदर मंदिर बनवलं आहे. केवळ महाराष्ट्र किंवा इतर राज्यापूरत ते मर्यादित नाही तर संपूर्ण जगासाठी हे सुंदर मंदिर होणं याचा आम्हाला आनंद आहे.” असे शिवलीला पाटील यांचे म्हणणे आहे. वारकरी सांप्रदायातील कुठल्याही वरिष्ठांना हे आमंत्रण मिळाले नसल्याचे त्यांनी या मुलाखतीत अधोरेखित केले आहे.
दरम्यान या सोहळ्याला महाराष्ट्रातील वरिष्ठ राजकीय व्यक्तींनाही आमंत्रण नसल्याचे सांगितले जाते. माननीय शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अयोध्येत आमंत्रण नसल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना हे आमंत्रण मिळाले नसले तरी त्या दिवशी ते नाशिकला जाणार आहेत असे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे. पक्षातील काही नेतेमंडळींच्या समवेत उद्धव ठाकरे २२ जानेवारी रोजी नाशिक येथील कालाराम मंदिरात जाणार आहेत. तिथे संध्याकाळी गोदावरी नदीच्या घाटावर महाआरतीचा सोहळा पार पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या महाआरतीला आम्ही तिथे उपस्थित राहून प्रभू श्रीरामांना वंदन करू असे त्यांनी म्हटले आहे.