marathi tadka

अभिनेते किरण माने यांचा शिवसेनेत प्रवेश पोस्ट शेअर करत म्हणतात “आमच्या गावातल्या एका मानसाच्या घरापुढं एक कुत्रं बसायचं..

एका राजकिय पोस्टमुळे मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी आता राजकारणातच एन्ट्री करत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. खरं तर किरण माने राजकारणात येणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण आज किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत शिवबंधन हातात बांधले आहे. यावेळी बीड मधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करत शिवबंधन हातात बांधलं आहे. शिवबंधन हातात बांधल्यानंतर किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, ” शिवसेना सर्व सामान्य लोकांची आहे. सध्याचे राजकारण पाहता ते खूपच गढूळ झालेलं आहे या परिस्थितीत एकटा माणूस लढा देत आहे. मी एक संवेदनशील अभिनेता आहे त्यामुळे एक माणूस म्हणून मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. संविधान वाचवण्यासाठी मी काम करणार आहे, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी नक्कीच पार पाडणार आहे. ”

kiran mane and udhav thakre
kiran mane and Uddhav Thackeray

यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना मानेंचे कौतुक केले. ” माने तुम्हाला जे पाहवत नाही ते खरं आहे. तुमच्याकडे शब्दांची ताकद आहे. आपण दोघेही लढू, सेनेत आल्यावर तुम्हाला पश्चाताप होणार नाही ,आलात त्याचा अभिमान वाटेल.” याचवेळी बीड मधील कार्यकर्त्यांना संबोधत त्यांनी “मी बीडमध्ये येणार आहे आजवर युतीमुळे आणि मुंडेसाहेबांमुळे बीड दुर्लक्षित झालं होतं पण आता त्याला पालवी फुटू लागली आहे. तिथल्या शेतकऱ्यांसाठी भव्य मोर्चा काढणार आहे. तुम्ही त्याचं नियोजन करा, मला बीड पूर्णपणे शिवसेनामय करून हविये. ” किरण माने हे मुलगी झाली हो या मालिकेत काम करत असताना त्यांनी एक राजकिय पोस्ट लिहिली होती. यावरून त्यांना प्रचंड प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. याचमुळे त्यांची मालिकेतून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. यासाठी किरण माने न्यायालयीन लढा देखील देत होते. मुलगी झाली हो या मालिकेनंतर त्यांना मराठी बिग बॉसच्या घरात लोकप्रियता मिळाली. सिंधुताई माझी माई या मालिकेत ते महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. सोशल मीडियावर त्यांनी लिहिलेल्या पोस्ट कायम चर्चेत राहिल्या आहेत त्यामुळे ते राजकारणात प्रवेश करतील असे त्यांच्याबाबतीत बोलले जात होते. आज त्यांच्याबद्दल वर्तवलेले हे भाकीत खरे ठरलेले पाहायला मिळाले.

kiran mane and Uddhav Thackeray photo
kiran mane and Uddhav Thackeray photo

नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे त्यात ते म्हणतात “आमच्या गावातल्या एका मानसाच्या घरापुढं एक कुत्रं बसायचं. त्यो मानूस त्याला भाकरी, पानीबिनी द्यायचा. दिवसभर ते कुत्रं तिथं टाईमपास करत बसायचं. लै आळशी आन् निरूद्योगी कुत्रं. सगळा वेळ झोपन्यात आन् मागच्या पायानं कान खाजवन्यातच जायचा. कुटं एखादी कुत्री दिसली की थोडावेळ उत्साहानं उठून हुंगत मागं जायचं… ती वस्स्सकन् खेकसली की परत त्या उंबर्‍याजवळच्या ठरलेल्या जागेत मुटकुळं करून बसायचं. पन एकाबाबतीत कसा कुनास ठावूक, त्याच्या अंगात उत्साह सळसळायचा. एखादी कार दिसली की, त्यामागं भुंकत पळत सुटायचं ते. लै लै लै खच्चून पळायचं. जीव खाऊन भुकायचं. असं वाटायचं ह्यो कारचा डायव्हर त्येला घावला तर फाडून खाईल. एक दिवस मी त्या मानसाला इचारलं,”तुझ्या कुत्र्याचा कारवर यवढा कस्ला राग हाय? कधी ह्येचा पाय बिय चिराडलावता का कारखाली?” त्यो मानूस म्हन्ला, “नाय वो. त्याला नादच हाय त्यो. मलाबी आधी प्रश्न पडायचा. मी लक्ष ठेवलं. एक दिवस ते आसंच कारमागं भुकत सुटलं. ते चाकाखाली यिवू नये म्हनून त्या डायव्हरनं कार थांबवली. मला वाटलं आता डायव्हरचं खरं नाय. आमचा टाॅम्या फाडनार त्याला. पन जशी गाडी थांबली तसं हे गयबान्या बोड्याचं भुकायचं थांबलं आन् भेदरून शेपूट घालून घराकडं बुंगाट पळत आलं !”

च्यायला ! …मला झटकन सोशल मिडीयावरचे ट्रोल्स आठवले. असंच असतं की राव त्यांचं. ज्यातनं काहीच आऊटपूट निघत नाय, असं वाह्यात ‘भुंकणं’ ! बाराया अशांना म्हन्त्यात, “भुंकुनिया सुने लागे हत्तीपाठी । होवोनिया हिंपुटी दु:ख पावे ।। काय त्या मशके तयाचे करावे । आपुल्या स्वभावे पीडितसे ।।”
…रस्त्यावरचं कुत्रं भुकत भुकत हत्तीच्या मागं लागतं, पन हत्ती त्याच्याकडं ढुंकूनबी बघत नाय. शेवटी हतबल होऊन ते दु:खी होतं… कानाभोवती-डोळ्यासमोर फिरून त्रास देणार्‍या चिल्टांचं काय करायचं? त्येच्या स्वभावातच ते पीडनं असतं. मला अशा ‘ट्रोल’ लोकांची कधीकधी कीव येते. सतत दुसर्‍यावर खार खात जगायचं. त्याच्या नांवाने खडी फोडायची. लै बेक्कार परावलंबी जीनं हाय लगा ते. आपलं भारीय राव. कुनावर जळनं नाय आन् कस्ला तरास नाय. उगं रातदिस दुसर्‍याच्या नांवाचा जप करन्यापेक्षा, आपल्या मनातलं आपलं म्हन्नं बिन्धास्त मांडत र्‍हानं. ‘फिलिंग लैच नादखुळा.’ ! आपल्याच तालात – सुपारी गालात ! – किरण माने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button