अॅनिमल या बॉलिवूड चित्रपटाला प्रदर्शित होऊन १३ दिवस झाली आहेत. या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कालपर्यंत या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल ४६७ कोटींची कमाई केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे येत्या काही दिवसातच हा चित्रपट ५०० कोटींचा पल्ला सहज गाठू शकेल असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. दरम्यान अॅनिमल चित्रपटात मराठमोळा अभिनेता म्हणून उपेंद्र लिमये चांगलाच भाव खाऊन गेले. त्यांच्या आवाजातील करारेपणा आणि दमदार अभिनयामुळे त्यांच्या एंट्रीला थिएटर्समध्ये शिट्ट्या वाजत आहेत. एका निर्मात्याला समोरचे हे दृश्य पाहून खूप आश्चर्य वाटले होते. त्यांनी उपेंद्र लिमये यांना फोन करून त्यांच्या या प्रसिद्धीचे मोठे कौतुक केले.
खरं तर उपेंद्र लिमये हे सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे त्यांचे कुठले नवीन प्रोजेक्ट आहेत ते त्यांच्या चाहत्यांना माहीत पडत नाही. याचाच परिणाम म्हणून अॅनिमल चित्रपटात उपेंद्र एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत हे चित्रपट पाहिल्यानंतरच सगळ्यांना समजले होते. उपेंद्र लिमये सोशल मीडियावर सक्रिय नसल्याचे कारण त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. महत्वाचं म्हणजे हिंदी चित्रपटात तुम्हाला काम करायचं असेल तर तुमचे फॉलोअर्स पाहिले जातात असा एक खुलासाच त्यांनी इथे करून दिला आहे. सुरुवातीला अॅनिमल चित्रपटात काम करण्यासाठी उपेंद्र लिमये यांनी नकार दिला होता. अश्लील संवादामुळे त्यांना हा चित्रपट करायचा नव्हता पण या भूमिकेसाठी तुम्हीच योग्य आहात असे म्हटल्यानंतर उपेंद्र लिमये या चित्रपटासाठी तयार झाले होते. अवघ्या १० मिनिटांच्या सिनमध्ये उपेंद्र लिमये यांच्या अभिनयाचे सगळ्यांनीच मोठे कौतुक केले.
यावर अनेक मिम्स देखील बनवले जाऊ लागले. हिंदी चित्रपट आणि सोशल मिडियावर सक्रिय नसल्याबद्दल त्यांना विचारले असता उपेंद्र लिमये म्हणतात की, ” मी सोशल मीडियावर सक्रिय नाही याबद्दल मला अजिबात खंत नाहीये. माझी मुलं मला याबाबत नेहमी बोलत असतात. मला सोशल मीडियाचा अजिबातच राग नाहीये पण हे माध्यम कसे हाताळावे याचे संस्कार दुर्दैवाने आपल्याकडे नाहीयेत. यातून नकारात्मकता जास्त निर्माण होते. काहीजण हे माध्यम खूप छान पद्धतीने हाताळतात मी त्यांना सलाम करतो. पण मला हे झेपत नाही म्हणून मी त्यापासून लांब राहतो. हिंदीमध्ये काही भूमिकांचे कास्टिंग हे सोशल मीडियावर असलेले फॉलोअर्स किती आहेत यावर ठरतं. सोशल मीडियावरील फॉलोअर्सवरून जर मी चांगला अभिनेता आहे हे ठरत असेल तर मी अभिनयाचं दुकानच बंद करायला हवं.”