अभिनेत्याचं थेट मुख्यमंत्र्याकडे गाऱ्हाणं…मानसिकतेचं खच्चीकरण होतंय राज्यातल्या भिकाऱ्यासारखीच कलावंतांची अवस्था
मराठी मालिका, चित्रपट अभिनेते उमेश बने यांनी थेट मुख्यमंत्रीकडे एक खंत व्यक्त करताना म्हटले आहे की, ” मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्यातल्या भिकाऱ्यासारखीच महाराष्ट्रातील मालिका कलावंतांची अवस्था आहे. तब्बल ९० दिवसानंतर मिळणारं पेमेंटही वेळेवर मिळत नाही. Income tax नावाखाली tds कट केला जातो. तो वेळेवर भरला जात नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रॉडक्शन हाऊस सोडली तर इतर ठिकाणी कलावंतांचे हालच, काही ठिकाणी खाण्याची व्यवस्था वाईट.
शिफ्टची वेळ ठरलेली असूनसुद्धा कोणताही अतिरिक्त मोबदला न घेता कलाकार रात्री उशिरापर्यंत शूटिंग करतो. तरी त्याला ९० दिवसांनी मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही. तुम्ही माहितीच्या आधारखाली सगळया प्रॉडक्शन हाऊसचे अकाउंट चेक करा , सत्य समोर येईल. काही जणांच्या मानसिकतेच एवढं खच्चीकरण झालंय की, त्यांनी आत्महत्येच्या पोस्ट टाकल्या. उद्या हा विषय पेट घेण्याआधी कृपया विधानसभेत आणि लोकसभेत हा विषय चर्चेला घ्या महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या कलावंतांसाठी.
कलाकारांना वेळेवर मानधन मिळालं पाहिजे त्यांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे असा GR काढून तो चॅनल आणि निर्मात्यांना बंधनकारक करा.” असे म्हणत उमेश बने यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडं घातलं आहे. अनेक प्रसिद्ध मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना अश्या परिस्थितीला समोर जावं लागत असेल तर इतर नवोदित कलाकारांवर किती समस्या असतील असं प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.