
मालिकेच्या कथानकाला कधी कुठले वळण द्यायचे हे सर्वस्वी लेखकाच्या हातात असते, असेच काहीसे चित्र सध्याच्या मालिकांमध्ये पाहायला मिळत आहे. अर्थात हा सर्व खटाटोप त्या मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठीच केला जातो हे सर्वश्रुत झालेले आहे. असाच काहीसा प्रकार झी मराठीच्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून घडताना दिसत आहे. लवकरच झी मराठी वाहिनी तीन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. त्यामुळे जुन्या मालिकेची उचलबांगडी झालेली पाहायला मिळत आहे. अशातच तू चाल पुढं ही मालिका पुढच्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सुरळीत सुरू असलेल्या या मालिकेला एक नवा ट्रॅक देण्यात आला आहे. इतके दिवस अश्विनीला त्रास देणारी मीरा आता चक्क श्रेयसलाच तिच्यासोबत लग्नासाठी तयार करताना दिसली आहे.

मिराचे श्रेयसवर कॉलेजपासून प्रेम असते पण त्याला आता पुन्हा मिळवण्यासाठी ती अश्विनीला जीवे मारण्याची धमकी देत आहे. अश्विनी जिवंत हवी असेल तर तू माझ्याशी लग्न कर असे म्हणताच हा श्रेयस सुद्धा खरोखरच आता मिरासोबत लग्न करताना दिसणार आहे. मालिकेच्या या नवीन ट्रॅकचे शूटिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे कथानकातले हे वळण पाहून प्रेक्षक मात्र भलतेच चिडले आहेत. एकीकडे मयुरीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू असतानाच मीरा श्रेयसला ही धमकी देत असते. पण इथे मात्र लेखकाचीच कीव कराविशी वाटते. मिराच्या धमकीला घाबरणारा श्रेयस तिला तिथेच कानफटात मारताना का दाखवला नाही, तो तिच्यापुढे एवढा हतबल का होतो? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
श्रेयसचे अश्विनीवर जर एवढे प्रेम आहे तर तो अश्विनी पासून हे सगळं का लपवतोय? त्यामुळे मालिकेच्या ह्या ट्रॅकला काहीच अर्थ नाही , उलट मयुरीचा साखरपुडा झाल्यानंतर शिल्पीला तिच्या चुकांची उपरती व्हावी आणि तिने सगळ्यांची माफी मागून पुन्हा कुटुंबात सामील व्हावे असा एक साधा सरळ गोड शेवट न करता श्रेयस आणि मिराच्या लग्नाचा घाट घातला जात आहे. हा सर्व खटाटोप कशासाठी? असा प्रश्न आता चिडलेल्या प्रेक्षकांना पडला आहे.