कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे. आतापर्यंत या मालिकेतील नायिकेने गावकऱ्यांच्या भल्यासाठी विचार केलेला पाहायला मिळाला. पण या सगळ्या संकटातून वाचवणाऱ्या चिंधीवरच आता सरकारने पलटवार केला आहे. सरकार दमडाजीला पोलिसांच्या ताब्यात देताना तो चिंधीच्या पोटात असलेलं बाळ माझं आहे असे हरबाला सांगतो. त्यामुळे हरबा चिंधीवर संशय घेतो. चिंधीसमोर आता हे आणखी एक नवं संकट येऊन उभं ठाकलं आहे. मालिकेत चिंधीची भूमिका अभिनेत्री शिवानी सोनार हिने साकारली आहे तर अतुल आगलावे हरबाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत लवकरच एका नवीन पात्राची एन्ट्री होत आहे.
हे पात्र अभिनेत्री नेहा शिंदे साकारणार आहे. नेहा शिंदे हिची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेतून तिची छोट्या पडद्यावर एन्ट्री होत आहे. नेहा शिंदे ही याच मालिकेतील अभिनेत्री विद्या सावळे यांची मुलगी आहे. विद्या सावळे यांनी लागीरं झालं जी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर बऱ्याचशा मालिकेतून त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली. तर त्यांचीच मुलगी नेहा ही देखील आईच्या पावलावर पाऊल टाकत मराठी सृष्टीत दाखल झाली आहे. विद्या सावळे यांना नेहा आणि निकिता अशा जुळ्या मुली आहेत. लहानपणापासूनच या दोन्ही मुलींना डान्सची आवड आहे. त्यामुळे दोन्ही मुलींनी कला क्षेत्रात दाखल व्हावे अशी विद्या सावळे यांची ईच्छा होती. त्यात आता नेहाला आपल्याच मालिकेत अभिनयाची संधी मिळतेय हे पाहून विद्या सावळे यांना खूप आनंद झाला आहे.
नेहा उत्तम नृत्यांगना तर आहेच पण ती उत्तम अभिनय सुद्धा करते असे म्हणत मालिकेच्या सहकलाकारांनीच तिचे कौतुक केले आहे. विद्या सावळे या मूळच्या बार्शीच्या. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्या नाटकातून काम करत होत्या. आपल्या दोन्ही मुलींचे पालनपोषण करत त्यांनी अभिनय क्षेत्रात इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे. त्यात त्यांना चांगले यश देखील मिळालेले आहे. सिंधुताई माझी माई या मालिकेतून मायलेकी प्रथमच एकत्रितपणे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या भूमिकेसाठी आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पणासाठी नेहा शिंदे हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.