स्टार प्रवाह वाहिनी टीआरपीच्या बाबतीत अग्रेसर ठरली आहे. या वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका टॉपच्या यादीत पाहायला मिळतात. डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झालेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका लोकप्रिय मालिका म्हणून महाराष्ट्राची नंबर एकची मालिका ठरली आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम दिलं आहे. या मालिकेच्या प्रसारणाची वेळ प्राईम टाईमला असल्याने बहुतेक घरांत ही मालिका पाहिली जाते. त्यामुळे हा टीआरपी मोडणे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. पण नुकत्याच आलेल्या थोडं तुझं थोडं माझं या मालिकेलाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. पहिल्याच आठवड्यात या मालिकेने ६.८ चा रेटिंग मिळवला आहे.तर ठरलं तर मग मालिकेला ६.९ रेटिंग मिळालेलं आहे. त्यामुळे अजून तरी ठरलं तर मग मालिकेने गड राखून ठेवलेला पाहायला मिळतो आहे.
पण आता स्टार प्रवाहच्या या टॉपच्या मालिकेला धक्का लागणार आहे. कारण ठरलं तर मग या मालिकेचा टीआरपी खाली खेचण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. याच प्राईम टाइम मध्ये झी मराठीने मोठे आव्हान स्वीकारत ठरलं तर मग मालिकेला तगडी टक्कर देण्यासाठी एक दमदार कथानक प्रेक्षकांसमोर आणलं आहे. हो तुम्ही बरोबर ओळखलं हे तगडं आव्हान देण्यासाठी ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका ८ जुलै पासून प्रसारित केली जाणार आहे. सुर्या आणि त्याच्या चार बहिणींची ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार अशी खात्री श्वेता शिंदेला आहे. त्याचमुळे ठरलं तर मग मालिकेचा टीआरपी कमी करण्यासाठी झी मराठीने ८.३० वाजता हा शो प्रसारीत करण्याचे ठरवले आहे. लाखात एक आमचा दादा या मालिकेचे कथानक हटके आहे त्यात गावरान बाज असल्याने ग्रामीण भागात या मालिकेला मोठी पसंती मिळू शकते असा वाहिनीला विश्वास आहे.
त्यात नितीश चव्हाण सारखा तगडा नायकही भाव खाऊन जाताना दिसत असल्याने मालिका हा टीआरपी नक्की खेचून आणू शकतो असे बोलले जात आहे. त्यामुळे ठरलं तर मग मालिकेला थोड्या फार प्रमाणात धक्का बसेल अशी चिन्ह दिसू लागली आहेत. शक्यतो ज्या मालिकेचा टीआरपी रेट जास्त असतो त्या वेळेत कुठलीही वाहिनी नवीन मालिका आणण्याचे टाळत असते पण झी मराठीने असे न करता हाच प्राईम टाइम लाखात एक आमचा दादा या मालिकेला देऊ केला आहे. पण असे असले तरी ठरलं तर मग मालिकेने आता त्यांच्या कथानकात रंजक ट्विस्ट आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. झी मराठीने हे मोठे आव्हान दिले असले तरी ठरलं तर मग मालिका त्यांचा टीआरपी राखून ठेवण्यास यशस्वी होईल का हेच आता पाहावे लागणार आहे.