
झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला मालिकेत एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एजे आणि लीलाचं प्रेम हळूहळू खुलू लागलं असतानाच आता या नात्यात पुन्हा विघ्न येणार आहे. एजेची पहिली बायको अंतरा हिची पुन्हा मालिकेत एन्ट्री होणार आहे. अर्थात ही अंतरा मेलेली असल्याने प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहून आश्चर्य वाटत आहे. पहिली पत्नी जिवंत नसताना ही अंतरा पुन्हा एजेच्या आयुष्यात कशी काय येऊ शकते? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अंतरा आतापर्यंत फक्त फोटोत पाहायला मिळत होती. ती मृत झालेली असल्याने तिची या मालिकेत एन्ट्री झाली नव्हती. ही भूमिका अभिनेत्री माधुरी भारती हिने साकारली आहे. माधुरी भारती ही गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे.
एक अभिनेत्री, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, निवेदिका म्हणून तिने या क्षेत्रात स्वतःची ओळख बनवली आहे. चांदणे शिंपित जाशी, लग्नाची बेडी, धडकन जिंदगी की, फास, मुक्ती, पुनश्च हरी ओम, बोन्साय, दहा बाय दहा अशा हिंदी मराठी मालिका, लघुपट, नाटक तसेच जाहिरातींमधून माधुरीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तिने तेजश्री प्रधानची बहीण मंजिरीची भूमिका साकारली होती. माधुरी ही मूळची संभाजीनगरची. नाट्यशास्त्र विभागातून अभिनयाचे धडे गिरवत असताना तिला ज्येष्ठ अभिनेते दिलीप घारे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत गेले. एकांकिका, आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा, व्यवसायिक नाटक असा तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.

मधल्या काळात काही चॅनल्ससाठी तिने क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केले. फास चित्रपटातून तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आता माधुरीने मालिका सृष्टीत चांगला जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेसोबतच ती आता झी मराठी वाहिनीच्या नवरी मिळे हिटलरला मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अजून तिची या मालिकेत एन्ट्री झाली नव्हती. पण अभिराम आणि अंतराचा भूतकाळ जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. आता अंतरा खरंच जिवंत आहे की तिच्यासारखी दिसणारी ही दुसरी कोणीतरी आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.