आपल्यात पूर्वापार रुजलेले संस्कार पृथ्वीतलावर… पायाखाली विश्वचषक ट्रॉफी पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट होतेय व्हायरल
रविवारी झालेल्या भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया या विश्वचषकातील उल्लेखनीय विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इंस्टाग्राम काही फोटो शेअर केले होते. यात मिशेल मार्शचा एक आक्षेपार्ह फोटो पाहून क्रिकेट प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या फोटोमध्ये मार्श विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवताना दिसला, तेव्हा अनेकांनी या फोटोला ‘अनादर केला’ असे म्हटले होते. ऑस्ट्रेलियाने २०२३ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकून अब्जावधी भारतीयांची मने अगोदरच दुखावली होती, पण त्यानंतर मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संस्कारहीन म्हटले.
मार्श पायाखाली विश्वचषक ट्रॉफी घेऊन सोफ्यावर बसलेला दाखविला. या फोटोमुळे नेटिझन्सने अष्टपैलू खेळाडूला ट्रॉफीचा अनादर करत असल्याचे म्हटले. अशातच मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी एक पोस्ट लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ” आपल्यात पूर्वापार रुजलेले संस्कार, पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेल्या प्रत्येकाने ग्राह्यच मानावेत…त्यानुसारच जगावं… अन्यथा….याच हट्टाग्राने जगात दहशतवाद आणला असेल ना…?!” असा विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला आहे. मिशेलच्या या कृत्यामुळे त्यांचे संस्कार कसे असावेत याची प्रचिती समोर येते.
अहमदाबाद येथे रविवारी झालेल्या फायनलमध्ये भारताचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या हॉटेलच्या खोलीत मार्शचा हा फोटो काढण्यात आला होता. मार्शला मात्र या सामन्यात चांगली खेळी करता आली नव्हती. पण तरीही त्याच्या या कृत्याने त्याने अनेक क्रिकेटप्रेमींची मनं दुखावली आहेत. अर्थात त्यांची जडणघडणही अशाच पद्धतीने झाल्याने आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान शरद पवार यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारतानाचा आणि त्यानंतर त्यांना दिलेल्या वागणुकीचादेखील असाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.