
नुकत्याच पार पडलेल्या ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी यांच्या चित्रपटाला पुरस्काराने गौरविण्यात आलं. आपण लहानपणी पाहिलेलं एक स्वप्न आज सत्यात उतरलं अशी प्रतिक्रिया ते एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देतात. सलील कुलकर्णी हे संगीतकार, गायक, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून या सृष्टीत वावरले आहेत. संगीतात डॉक्टरची पदवी त्यांनी प्राप्त केली. अनेक हिंदी मराठी गाण्यांना त्यांनी संगीत दिलं आहे. संदीप खरे सोबतचा त्यांचा आयुष्यावर बोलू काही या सांगीतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलील कुलकर्णी यांनी सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टला मुलाखत देताना आयुष्यातील अनेक धागेदोरे उलगडले. ते म्हणतात की, मी खूप लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. आईने कुकरिंग करत मी आणि माझ्या बहिणीला लहानाचं मोठं केलं.

एक मोठी व्यक्ती बनवण्यापेक्षा तिने आम्हाला माणूस म्हणूनच घडवलं होतं. मला लहान मूलांवर विशेष प्रेम आहे. माझे वडील गेल्याचं दुःख होतं पण जेव्हा या मोठ्या व्यक्ती मुलांकडे जाऊन त्याच्या नावाची वडिलांची चौकशी करतात ते मला खटकायचं. माझ्या मित्रांशी बोलल्यानंतर ते माझ्याकडे येतील असे वाटायला लागते तेव्हाच मी तिथून बाजूला निघून जायचो. मला बाबा नाहीयेत हे कळल्यावर ते जी सहानुभूती दाखवतात ती मला नको होती. किमान असा त्रास त्यांनी देऊ नये इतका त्यांच्यात सेन्स नसावा का?. मला अजूनही अशा गोष्टींचा त्रास होतो. संगीत क्षेत्रातील मोठमोठ्या गाणाऱ्या गायिकांपासून ते थेट अगदी गायक, ज्येष्ठ नागरिक असतील ते सगळे बिनधोकपणे गॉसिप करताना दिसायचे.आणि मला तोंडावर येऊन विचारायचे की तू हिच्याशी लग्न केलं होतंस ना?….ही वृत्ती मला रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या माणसाचे अंगठी आणि घड्याळ काढून नेणाऱ्या माणसाचीच वाटते. १३ चा काळ माझ्या आयुष्यात खूप कठीण होता. माणसं एका अडचणीत असतात ती वेळ त्याला एकट्याने लढू द्या, तुम्ही मदत करू नका.

माझ्याच बाबतीत म्हणून नाही तर इतरांच्याही बाबतीत हे घडतंय. उलट लोकं अशा गोष्टी एन्जॉय करतात, ‘अरे तुला काही कळलं की नाही’…हा कुठला टोन आहे. एक पुरुष जो एकटा मुलांना वाढवतोय त्याच्या बाबतीत किंवा तिच्या बाबतीत असं काही बोलतात तेव्हा असं वाटतं की त्याचं त्याला धडपडू द्या ना, तो तुमच्याकडे काही मदत मागत नाहीये ना, मग लांबून खडे कशाला मारायचे?” असे म्हणत सलील कुलकर्णी यांनी २०१३ साली घेतलेल्या घटस्फोटाबद्दल उलगडा केला. संदीप खरेने स्वतः यावर लेख लिहिला होता की, प्लिज , तुम्ही त्याला त्रास देऊ नका . तो आता फक्त मुलांचं करतोय उद्या कधी त्याने लग्न केलंच तर तो तुम्हाला सांगेल. सलील कुलकर्णी यांचे नाव एका गायिकेसोबत जोडण्यात आले होते. आम्ही त्या लग्नात जेवून आलोय अशा खूप चर्चा त्यावर ऐकायला मिळायच्या. सलील कुलकर्णी यांचे गायिका अंजली मराठे सोबत लग्न झाले होते. खाजगी कारणास्तव ते विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर ६ आणि ९ वर्षांच्या शुभंकर आणि अनन्या या दोन्ही मुलांचा त्यांनी सांभाळ केला. २०१३ च्या आधीचा मी आणि २०१३ नंतरचा मी पूर्णपणे वेगळा आहे असे सलील कुलकर्णी या मुलाखतीत म्हणतात.